२०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला होता. याचकाळात काही प्रमाणात डेंग्यूचे रुग्णही आढळून आले. डेंग्यू हा एक प्रकारचा विषाणूजन्य आजार असून, तो डासांद्वारे पसरतो. असे चार प्रकारचे विषाणू आहेत, जे या आजारास कारणीभूत आहेत. डेंग्यू त्यापैकी कुठल्याही एकाने होऊ शकतो. एन्डी इजिप्सी डासाने डेंग्यू विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित केला जातो. संक्रमित व्यक्तीच्या शरीरावर रक्त शोषताना डास स्वत: विषाणूग्रस्त होतो. डेंग्यू आजार होऊ नये म्हणून शहरांसह ग्रामीण भागात धूरफवारणी व अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक ठोस उपाययोजना नसल्याने २०२० मध्ये डेंग्यू आजारही काही प्रमाणात बळावल्याचे दिसून येते. २०१८, २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये डेंग्यूचे रुग्ण अधिक संख्येने आढळून आले.
00
अशी आहेत डेंग्यूची लक्षणे
अचानक जोराचा ताप येणे.
डोक्याचा पुढचा भाग खूप दुखणे.
डोळ्याच्या मागील भागात वेदना होणे.
स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होणे.
छाती आणि त्यावर गोवरसारखे पुरळ येणे.
मळमळणे आणि उलट्या होणे. त्वचेवर व्रण उठणे.
00
डेंग्यूचा सर्व्हे
डेंग्यू रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागातर्फे त्या भागात सर्व्हे करण्यात येतो. २०२० मध्ये २० डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्यानंतर या २० ठिकाणी सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. जवळपास एक हजारांवर घरांची तपासणी करण्यात आली.
००००
साथरोग प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. यावर्षी जिल्ह्यात डेंग्यूचे २० रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनीदेखील आरोग्याची काळजी घ्यावी..
- डॉ. प्रसाद शिंदे, जिल्हा हिवताप अधिकारी