वाशिम : गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित मानधनासह वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन समिती गठीत करण्याच्या मागणीसाठी विदर्भ लोककलावंत संघटनेने २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन केले. वाढती महागाई लक्षात घेऊन शासनाने कलावंताना कमीत कमी पाच हजार रुपये दरमहा मानधन सुरु करावे यासह अन्य प्रश्न निकाली काढण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्यासह लोककलावंतांनी केली.
000
ग्रामसेवक, शिक्षकांची पदे रिक्त
किन्ही राजा : किन्ही राजा जिल्हा परिषद गटातील ग्रामसेवक, शिक्षकांची जवळपास नऊ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली. परंतु, अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाही.
०००००
सौर पंप योजनेतून जऊळक्याला डच्चू
जऊळका रेल्वे : सिंचनासाठी सौर पंपाची जोड मिळाली याकरिता कृषी सौरपंप योजना राबविण्यात येत आहे. काही तांत्रिक कारणामुळे २०२०-२०२१ मध्ये या योजनेत मालेगाव तालुक्याचा समावेश झाला नाही. त्यामुळे या योजनेपासून जऊळका परिसरातील शेतकरी वंचित राहत आहे.
००००००
जि.प. शाळा इमारतीची दुर्दशा
केनवड : केनवड जिल्हा परिषद गटातील दोन यासह रिसोड तालुक्यातील जवळपास १८ जिल्हा परिषद शाळेच्या २६ वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्यासाठी निधीची मागणी नोंदविण्यात आली. परंतु, अद्याप वर्गखोल्यांची दुरूस्ती झाली नाही.
०००००
लक्षणे असल्यास चाचणी करावी
रिठद : सर्दी, ताप व खोकला, घसा आदी लक्षणे असणाऱ्या तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या संदिग्ध रुग्णांनी वेळ न दडविता तातडीने कोरोना चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने गुरूवारी केले.