वाशिम : १९९३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘राघववेळ’ या गाजलेल्या कादंबरीला डिसेंबर १९९५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘मोराचे पाय’, ‘ऊन सावली’, ‘सांजरंग’ या नावाने एकाहून एक सरस अशा कादंबऱ्या प्रकाशित होत गेल्या. २१ पुस्तके, प्रकाशित पुस्तकांमध्ये ८ कादंबऱ्या, ४ कवितासंग्रह, २ कथासंग्रह, २ ललित लेख, एक चरित्र, एक भाषण, एक समीक्षा, अशा विविधांगी ग्रंथसंपदेचे रचयिता वाशिम येथील प्रसिद्ध साहित्यिक नारायण चंद्रभान कांबळे यांना देशातील सर्वोच्च समजला जाणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यायोगे वाशिमच्या साहित्यक्षेत्रात सन्मानाचा तुरा खोवला गेला आहे. यानिमित्त ना.चं. कांबळे यांच्याशी साधलेला हा संवाद.
तुमच्या जीवन प्रवासाविषयी काय सांगाल?
माझा जन्म जैनांची काशी शिरपूर जैन येथे चंद्रभान आणि भुलाबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे लहानपण अठराविश्व दारिद्र्यातच गेले. अशाही स्थितीत शिक्षण घेत राहिलो. कालांतराने गावातच चौकीदाराची नोकरी लागली आणि यामुळे थोडीफार परिस्थितीही सुधारली. बी.ए., डी.एड. पूर्ण केल्यानंतर वाशिम येथे रा.ल. कन्या शाळेत १९७५ मध्ये वॉचमन आणि त्यानंतर १९७७ मध्ये शिक्षक म्हणून नोकरी लागली. १९७१ मध्ये लग्न झाले. लग्नापूर्वी एमबीबीएसच्या प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झाल्याने जीवनात नैराश्य आले. त्यातूनच कविता रचायला सुरुवात केली. सोबतच कथा, कादंबरी, ललित, भाषणांवर लेखणी झिजवत पुढचा प्रवास सुरू केला. कलावंत असो अथवा साहित्यिक दोघेही दरिद्रीच असतात, याचा अनुभव वेळोवेळी येत राहिला. परंतु, त्यातूनच आगळीवेगळी कलाकृती जन्माला आणणे शक्य झाले.
तुम्हाला डिसेंबर १९९५ मध्ये साहित्य अकादमी मिळाली; तर २५ वर्षांनंतर सर्वोच्च पुरस्कार ‘पद्मश्री’ जाहीर झाला, याबाबत आपली प्रतिक्रिया काय?
माझ्या ‘राघववेळ’ या कादंबरीला डिसेंबर १९९५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. त्यावेळी मी साहित्यक्षेत्रात नवखाच असल्याने तो माझ्यासाठी अनपेक्षित धक्का होता. कारण, स्पर्धेत कसलेल्या गंगाधर गाडगीळ यांचे ‘एका मुंगीचे महाभारत’ आणि सुनीता देशपांडे ‘आहे मनोहर तरी’ ही पुस्तके होती. साहित्य अकादमी पुरस्कार हा माझ्यासाठी सुवर्ण क्षण होता; तर आता थेट पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यामुळे माझ्या साहित्यव्रताचे खऱ्या अर्थाने चीज झाले, असेच मी म्हणेन.
तुमच्या आतापर्यंतच्या कादंबऱ्या, कथासंग्रहांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत?
‘राघववेळ’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार, ह. ना आपटे, बा. सी. मर्ढेकर, ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, ‘ऊन सावली’ला वि. स. खांडेकर पुरस्कार मिळाला आहे. यासह सांजरंग, मोराचे पाय आणि कृष्णार्पण या कादंबऱ्यांनाही विविध संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘राघववेळ’चा बंगाली अनुवाद ‘रघबेर दिनराज’ २००९ मध्ये प्रकाशित झाला. त्याला २०११-१२ मध्ये साहित्य अकादमी मिळाली. १९९५ मध्ये ‘राघववेळ’ला; तर १९९६ मध्ये ‘ऊन सावली’ला राज्य पुरस्कार मिळाला. याशिवाय संत गाडगेबाबा समरसता पुरस्कार, सामाजिक एकता पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्काराने आतापर्यंत मला सन्मानित करण्यात आले आहे.