२०व्या पशुगणनेनुसार, जिल्ह्यात १ लाख ६८ हजार ९१ गायी, ८९ हजार ८२६ म्हशी, १ लाख १९ हजार ६१९ शेळ्या व ९ हजार ३९४ मेंढ्या आहेत. पावसाळ्यात प्रामुख्याने याच जनावरांना घटसर्प, एकटांग्या, आंत्रविषार (इटीव्ही), धनुर्वात आदी आजार जडतात. त्यापासून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करावे लागते. असे असताना विविध स्वरूपांतील प्रलंबित मागण्या शासनाने पूर्ण कराव्या, यासाठी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पशुधन पर्यवेक्षक व सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांनी आंदोलन पुकारले. या दरम्यान, जनावरांच्या लसीकरणावरही बहिष्कार टाकण्यात आल्याने ही प्रक्रिया पूर्णत: खोळंबली.
संबंधित कर्मचाऱ्यांनी १ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन पुकारले, तर २ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. त्यानंतर, मंत्रालयीन पातळीवर मागण्या मान्य करण्याची ग्वाही मिळाल्याने संबंधितांनी ५ ऑगस्ट रोजी आंदोलन मागे घेऊन इतर कामांसोबतच जनावरांच्या लसीकरणालाही वेग दिला. मात्र, वेळ झपाट्याने निघून जात असताना ३ लाख ८६ हजार ९३० जनावरांपैकी आजमितीस ८० हजारांच्या आसपास जनावरांचे लसीकरण पूर्ण होऊ शकले आहे.
.................
लसींचाही तुटवडा उद्भवण्याची शक्यता
जिल्ह्यात गाय, म्हशी, शेळी आणि मेंढ्यांची संख्या ३ लाख ८६ हजार ९३० आहे. लसीकरणासाठी किंबहुना तेवढ्याच लसींचे डोस उपलब्ध व्हायला हवे होते. मात्र, आतापर्यंत केवळ १ लाख ६० हजार डोस उपलब्ध झाले असून, लसींचाही तुटवडा उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
.................
जिल्ह्यातील पशुधन व झालेले लसीकरण
गायी - १,६८,०९१/३०,२४९
म्हशी - ८९,८२६/२२,७५१
शेळ्या - १,१९,६१९/२५,३३६
मेंढ्या - ९,३९४/२४६२
एकूण पशुधन/झालेले लसीकरण
...................
कोट :
मध्यंतरी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे पावसाळ्यात होणाऱ्या जनावरांच्या लसीकरणास ‘ब्रेक’ लागला होता. आता मात्र, यास प्रक्रियेस वेग देण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या लसींचे १ लाख ६० हजार डोस उपलब्ध झाले होते. त्यातून गेल्या आठ दिवसांत ८० हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
- भुवनेश बोरकर, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, वाशिम.