वाशिम : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी चार कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी बुधवारी केले.
ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी, उद्योगधंदा उभारणीसाठी कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यात आली. लाभार्थ्यांचे वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असावे. उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती, जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधारकार्ड, करारनामा, सातबाराचा उतारा, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, दोन जामीनदाराचे हमीपत्र अथवा गहाणखत, स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल यासह आवश्यक कागदपत्रांचा तपशील अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. पात्र अर्जदार व्यक्तींनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले.
०००००
अशा आहेत चार योजना
२० टक्के बीज भांडवल योजना असून यामध्ये कर्ज मर्यादा ५ लक्ष रुपये आहे. बँकेचा सहभाग ७५ टक्के, महामंडळाचा सहभाग २० टक्के आणि लाभार्थ्याचा सहभाग ५ टक्के असून कर्ज परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षांचा आहे. थेट कर्ज योजना या योजनेची कर्ज मर्यादा १ लक्ष रुपये असून कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्ष आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (ऑनलाइन) या योजनेची कर्ज मर्यादा १० लक्ष रुपये आहे. गट कर्ज व्याज परतावा योजना (ऑनलाइन) या योजनेची कर्ज मर्यादा ५० लक्ष रुपये आहे.