२०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोव्हेंबर महिन्यात २३ तारखेपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. कोरोनाचा आलेख आणखी खाली येत असल्याने, २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यानुसार, मार्च महिन्यापासून बंद असलेल्या प्राथमिक शाळा बुधवार, २७ जानेवारीपासून गजबजणार आहेत. जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या एकूण ७१४ शाळा असून, येथे ८२ हजार ६६६ विद्यार्थी संख्या आहे. स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समिती, शाळा प्रशासन व मुख्याध्यापक हे शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. ज्या शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता, हॅण्डवॉश व अन्य अनुषंगिक दृष्टीने तयारी पूर्ण झाली असेल, शालेय व्यवस्थापन समितीची परवानगी मिळाली असेल, त्याच शाळा पहिल्या दिवशी उघडणार आहेत. चार तासिकांसाठी वर्ग सुरू राहणार असून, प्राधान्यक्रमाने इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिकविले जाणार आहेत.
००
इंग्रजी, गणित, विज्ञान, भाषा विषयांसाठी जावे लागणार शाळेत
चार तासिका होणार असल्याने, यामध्ये प्राधान्याने इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यानंतर, उर्वरित एका तासिकेमध्ये मराठी, हिंदी या विषयाचे धडे दिले जाणार आहे. संमतीपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष वर्गात शिकविण्यात येणार आहे.
००
२७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. पालकांची संमतीपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच वर्गात प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने शिकविले जाईल. चार तासांच्या या वर्गात इंग्रजी, विज्ञान व गणित विषय प्राधान्यक्रमाने शिकविण्यात यावे, अशा सूचना दिलेल्या आहेत.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम
००
जिल्ह्यात कोरोनाचा आलेख कमी झालेला आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थींचे वय कमी असते. त्यामुळे शाळा प्रशासनाने फिजिकल डिस्टन्सिंग, बैठक व्यवस्था, हॅण्डवॉश स्टेशन आदीबाबत विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. शाळेतून कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पूर्ण दक्षतेनंतरच विद्यार्थी शाळेत पाठविले जातील.
- राजू इंगळे,
पालक वाशिम
००
जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी ८२,६६६
एकूण शाळा ७१४