कारंजा : शहरात दोन ठिकाणी धाडसी चोरी करणार्या दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक पोलीसांनी २७ जून रोजी जेरबंद केले आहे. मागील दोन महिन्यात शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. एक-दोन नव्हे तर चक्क पाच ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून व्यापारी तथा नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. दरम्यान, १९ जून रोजी बायपासवरील कृष्णा कृषि केंद्र फोडून चोरट्यांनी ४५00 रूपये लंपास केले होते. या प्रकरणी संचालक कृष्णा दामोदर पाकधने यांनी दुसर्या दिवशी पोलीसात फिर्याद नोंदविली व सीसीटीव्ही फुटेजची क्लिप पोलीसांना दिली. त्यामध्ये दोन चोरटे कृषि सेवा केंद्र फोडताना स्पष्टपणे दिसून येत होते. ही क्लिप पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी शेजारच्या एलसीबी व डीबी स्कॉडकडे पाठविली. मानोरा एलसीबीने क्लिप पाहिल्यानंतर घटनेतील चोर मानोरा येथील असल्याचे सांगीतले. यावरून एपीआय अढाऊ , शिपाई पोटवाले, रविंद्र वानखडे, चरण चव्हाण तथा इतरांनी मानोरा येथे जाऊन तेथील पोलिंसांच्या मदतीने वसंतनगर येथील आरोपी रवि उर्फ बंडू मारोती धोंगले (वय २३) व शेख मुश्ताक शेख लाला उर्फ फकिरा यास अटक केली. दोघांना येथील पोलिस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांना व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली.ती क्लिप पाहिल्यावर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. दरम्यान, २८ जून रोजी दोन्ही आरोपींना येथील न्यायालयाने १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कारंजा येथील कि.न.गोयनका महाविद्यालयाचे प्रा.ए.एस.शेख यांच्या काजी प्लॉट येथील निवासस्थानी २९ जून रोजी चोरी झाली होती. ही चोरी देखील आपणच केल्याचे त्या चोरट्यांनी कबूल केले आहे.
कारंजात अट्टल चोरटे जेरबंद
By admin | Updated: June 30, 2014 02:08 IST