कोणासोबत काैटुंबिक अथवा वैयक्तिक वैर असेल आणि त्याच्यापासून जीवितास धोका असेल, तर वेळप्रसंगी उद्भवणाऱ्या संकटातून स्वत:चा जीव सुरक्षित ठेवण्याकरिता जवळ शस्त्र बाळगण्याचा परवाना गिमातला जातो. यासह वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठीही शस्त्र परवाना दिला जातो. मात्र अलीकडच्या काळात राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये जवळ बंदूक असावी, केवळ याचसाठी फॅशन म्हणून शस्त्र परवाना मिळविला जात असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. कमरेला पिस्तूल असल्यास समाजात प्रतिष्ठा वाढते, असाही अनेकांचा समज झालेला आहे. त्यामुळे शस्त्र परवान्यांसाठी दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे. आतापर्यंत मिळालेल्या शस्त्र परवान्यांमध्येही राजकारणी, बिल्डर्स याच लोकांचा अधिक समावेश आहे. जिल्ह्यात ३०२ जणांकडे शस्त्र परवाने आणि शस्त्र असले तरी, या माध्यमातून गंभीर गुन्हा घडलेला नाही.
................
शस्त्र परवाना काढायचा कसा?
ज्या व्यक्तीस शस्त्र परवाना काढायचा आहे, त्यास कुटुंबातील सर्व सदस्यांचे प्रतिज्ञापत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, पोलीस पाटील, तलाठी दाखला अर्जासोबत जोडावा लागतो. पोलिसांकडून गुन्ह्यांची पडताळणी होते. जिल्हाधिकारी सुनावणी घेतात. खात्री झाल्यानंतरच परवाना दिला जातो.
................
वाशिममध्ये सर्वात जास्त; मानोऱ्यात सर्वात कमी
वाशिम तालुक्यात सर्वाधिक शस्त्र परवाने देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये वाशिम शहरात ५० पेक्षा अधिक परवाने आहेत. आणखी परवाने मिळण्यासाठी जिल्ह्यातून अर्ज दाखल होत आहेत. त्या तुलनेत मानोरा तालुक्यात केवळ १० परवाने आहेत; परंतु वाशिम शहर परवाना घेण्यासाठी सर्वात पुढे आहे. यात राजकीय आणि व्यावसायिकांचा समावेश आहे.
....................
नियम कडक करण्याची आवश्यकता
शस्त्र परवाना मिळविण्याची प्रक्रिया तुलनेने अधिक किचकट आहे; मात्र फॅशन म्हणून शस्त्र परवाने जवळ बाळगले जात असून नियम आणखी कडक करणे गरजेचे आहे.
अत्यावश्यकता असेल त्यालाच शस्त्र परवाना मिळायला हवा; मात्र, अनेकजण फॅशन म्हणून परवाना घेत आहेत, त्यावर जरब बसायला हवी.
....................
शस्त्र सांभाळणे कठीण
अनेकवेळा घर अथवा बाहेर क्षुल्लक कारणावरून वाद होतात. सामोपचाराने ते मिटविता येतात; मात्र अशाप्रसंगी रागाच्या भरात परवाना मिळालेल्यांकडून शस्त्राचा वापर होऊ शकतो. त्यामुळे शस्त्र सांभाळणे कठीणच आहे.
जिल्ह्यात परवाना असलेल्या शस्त्राद्वारे आतापर्यंत एकही अनुचित घटना घडलेली नाही.
जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीची पोटनिवडणूक जाहीर झाली असून ज्यांच्याकडे शस्त्र परवाने आहेत, त्यांनी आपले शस्त्र नजीकच्या पोलीस ठाण्यात जमा करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
...................
सात वर्षांत वाढले शस्त्र परवाने
जिल्ह्यात पूर्वी मोजक्याच लोकांकडे शस्त्र परवाना असायचा; मात्र सात वर्षांत ही संख्या वाढलेली आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील ३०२ लोकांकडे शस्त्र परवाना आहे. त्यातील अनेकांकडे पिस्तूल आहे; मात्र यामुळे अद्याप कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही.
.................
१) जिल्ह्यातील एकूण शस्त्र परवाने - ३०२
वाशिम - १०३
रिसोड - ६३
मालेगाव - ३२
मंगरूळपीर - ४०
कारंजा - ५४
मानोरा - १०