जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी कृषिपंपाच्या वीज पुरवठ्यासाठी महावितरणकडे रीतसर अर्ज करून कोटेशनची रक्कम भरली आहे. तथापि, शासनाचे धोरण आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे यातील बहुतांश शेतकरी अद्यापही कृषिपंपाच्या जोडणीपासून वंचित आहेत. त्यात रिसोड तालुक्यातील दापुरी येथील दिनकर भालेराव यांचाही समावेश आहे. दिनकर भालेराव यांनी ९ डिसेंबर २०१६ रोजी शिरपूर येथील महावितरणच्या कार्यालयात कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी रीतसर अर्ज केला आणि त्यासाठी कोटेशननुसार रकमेचा भरणाही केला. त्यामुळे त्यांना वीज जोडणी मिळण्याची अपेक्षा होती; परंतु आता पाच वर्षे उलटून गेली तरी महावितरणने त्यांना कृषिपंपासाठी वीज जोडणीच दिली नाही. त्यामुळे शेतात सिंचन करणे अशक्य असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
----------
मुख्य अभियंत्यांना निवेदन
पाच वर्षांपूर्वी महावितरणच्या शिरपूर कार्यालयात कृषिपंपांच्या वीजजोडणीसाठी रीतसर अर्ज करून आणि कोेटेशनची रक्कम भरूनही वीज जोडणी मिळत नसल्याने दापुरी येथील शेतकरी दिनकर भालेराव यांनी वारंवार अधिकाऱ्यांकडे चौकशी केली, शेतात कृषिपंपाला वीज पुरवठा देण्याची विनंती केली; परंतु अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा भागवत भालेराव यांनी महावितरणच्या वाशिम येथील कार्यालयात मुख्य अभियंत्यांकडे निवेदन सादर करून वीज जोडणी देण्याची मागणी केली आहे.