खरीप हंगामातील पिके आता चांगली बहरत असताना या पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे पिकांचे नुकसान हाेऊन उत्पादन घटण्याची भीती असल्याने शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहेत. ही फवारणी करताना मात्र आवश्यक काळजी त्यांच्याकडून घेण्यात येत नाही. अशात त्यांना विषबाधा होऊन जीव धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळेच एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून आवश्यक असेल तरच लेबल क्लेम शिफारशीत कीटकनाशकांचा योग्य फवारणी तंत्राद्वारे वापर करून किडींचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच तणनाशके फवारताना स्वतंत्र पंप वापरावा, अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी, असा शास्त्रोक्त सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे हे शेतकऱ्यांना देत आहेत. डवरे यांनी १९ जुलै रोजी रिसोड तालुक्यातील कवठा येथील आनंदा राजाराम सावसुंदर, उद्धव हनुमंत सावसुंदर, प्रभाकर हनुमंता सावसुंदर, सदाशिव नामदेव सावसुंदर यांच्या शेतामधील सोयाबीन, कपाशी, वांगी, मिरची आदी पिकांची पाहणी करून फवारणीचे द्रावण तयार करणे, फवारणी करताना सुरक्षा किटचा वापर करणे, तसेच सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राबाबत इतर बारकावे व कौशल्याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले व शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे व प्रश्नांचे निराकरण केले.
---------------------------
जिल्हाभरात जनजागृती मोहीम
कृषी विज्ञान केंद्र वाशिमच्या पीक संरक्षण शाखेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन सोयाबीन, कपाशी तूर व इतर प्रमुख खरीप पिकांत विविध कीडनाशकांचा वापर आवश्यक तेवढाच व सुरक्षित व शास्त्रोक्तरीत्या होण्याच्या अनुषंगाने शास्त्रोक्त फवारणी तंत्र, तसेच सुरक्षित फवारणी याविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या जनजागृती मोहिमेचे नेतृत्व नियोजन व मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र वाशिम डॉ. रवींद्र काळे हे कार्य करीत आहेत.