गजानन गंगावणे / देपूळ (जि. वाशिम) ग्रामस्थांना सुख,शांती लाभावी, आरोग्याचे संरक्षण व्हावे तसेच सद्भावना, एकोपा सर्वधर्म समभाव निर्माण व्हावा याकरिता १८१३ साली रामजी पाटील गंगावणे यांनी मातीच्या पुरातन गडीवर हवेलीमध्ये लाकडी गणेशाची स्थापना केली. आज रोजी या मंदिराला २0३ वर्षे होत असून हे मंदिर जिर्ण झाले आहे. या मंदिराची पडझड होत असून एका वर्षामध्ये या मंदिराचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ग्रामस्थ तथा समाजसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेवुन या मंदिराचा जिर्णोव्दार करणे गरजेचे आहे. देपूळ येथे २0३ वर्षाची पुरातण परंपरा लाभलेल्या राज हवेलीगत गणेश मंदिर आहे. दरवर्षी त्या काळात म्हणजे १८ व्या शतकात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केल्या जात होता. यामध्ये हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध धर्माचे लोक एकत्र येउन गणेश उत्सव साजरा करायचे. त्या काळातही अस्पृष्यता तथा वर्ण भेदावर मात करणारे हे गणेश मंदिर आहे. १८१३ साली रामजी पाटील गंगावणे यांनी हवेलीमध्ये गडीवर या गणेशची स्थापना केली. या मंदिराचे नक्षिकाम चंदपूर येथील गौंड राज्याच्या राजधानीच्या नक्षिकामास तंतोतत जुळते. १८१३ पासून आज पर्यंत सातत्याने येथे हा उत्सव साजरा होतो. यामध्ये गणेशाची मिरवणूक डोक्यावर मुर्ती घेवून गुलाला ऐवजी फुल उधळून टाळ मृंदगाच्या निनादात काढली जाते. १८१३ मध्ये रामजी पाटील गंगावणे यांनी ही परंपरा चालविली. त्यांच्या मृत्यूनंतर आनंदराव रामजी गंगावणे त्यानंतर नारायणराव गंगावणे, विश्वनाथ आनंदराव गंगावणे, काशीनाथ गंगावणे यांनी ही परंपरा चालविली. नारायणराव गंगावणे यांच्या मृत्यू नंतर १९५८ पासून ते २00६ पर्यंंंंत हा उत्सव कलावंताबाई गंगावणे यांनी चालविला. २00६ ते आजतागायत या मंदिराचे पुजारी वारसदार मुरलीधर विश्वनाथ गंगावणे हे गणेश उत्सव चालवित आहे. परंतु आज रोजी या मंदिराचे अस्तीत्व धोक्यात आले असून त्याचा निर्णोव्दार करण्याची गरज आहे. याकरिता सामाजिक संघटना, दानशूरांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.