प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त २६ जानेवारीला पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक जनार्दन खेडकर, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, अप्पर जिल्हाधिकारी शरद पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई म्हणाले, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी गेल्या मार्चपासून विविध उपाययोजना केल्या. जिल्ह्यातही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ‘विशेष बाब’ म्हणून ५ कोटी रुपये, तर राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले. जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ५ हजार ६४५ लाभार्थ्यांवरील विविध उपचारांवर १४ कोटी रुपये खर्च केले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील ९० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची ५७२ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जुने सिंचन प्रकल्प दुरुस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने ९९ प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी ३६ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे साडेतीन ते चार हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येण्यास मदत होईल, असे पालकमंत्री म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री देसाई यांनी परेड निरीक्षण केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाट यांनी केले.