वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा आणि मंगरूळपीर या पाच तालुक्यांमध्ये १६ जानेवारीपासून २३ जानेवारीपर्यंत पाचवेळा राबविण्यात आलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत दरदिवशी ३०० लस देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र पहिल्या दिवशी केवळ १६७ जणांनी लस घेतली. त्यानंतरही विशेष प्रतिसाद लाभला नाही. २५, २७ आणि २८ जानेवारीला दरदिवशी ५०० लस देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले; परंतु दोन दिवस प्रत्येकी ४४२ व ३४४ जणांनी लस घेतली तर २८ जानेवारीला २८८ जण लस घेण्यासाठी पुढे आले. त्यामुळे एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत अजूनही ३ हजार ४७४ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे बाकी आहे.
या तुलनेत नजीकच्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रातील नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांनी न घाबरता लसीकरणासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.
.................
बॉक्स :
लसीकरणात महिलांचे प्रमाण
जिल्ह्यातील कायमस्वरूपी तथा कंत्राटी तत्त्वावर कार्यरत सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. त्यात परिचारिका, औषध निर्माता यासह विविध पदांवर कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. लसीकरणात महिलांचे प्रमाण समाधानकारक आहे; मात्र खासगी वैद्यकीय क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण अगदीच कमी असल्याचे दिसत आहे.
......................
बॉक्स :
पहिला टप्पा आटोपल्यानंतर मिळणार लसींचा दुसरा साठा
१) कोरोना विषाणू लसीकरण मोहिमेत पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील शासकीय व खासगी अशा ५ हजार ६७८ कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यासाठी ६ हजार ५०० लसींचा साठा आरोग्य विभागास उपलब्ध करून देण्यात आला आहे.
२) वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण आटोपल्यानंतर जिल्ह्याला लसींचा दुसरा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
३) लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात महसूल विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने तयारी करण्यात आली आहे; मात्र सुरुवातीच्या टप्प्यातील ३ हजार ४७४ कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्याप बाकी असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
.....................
कोट :
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ५ हजार ६७८ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. त्या अनुषंगाने युद्धस्तरावर जनजागृती करण्यात आली; मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. लस पूर्णत: सुरक्षित असून कर्मचाऱ्यांनी न घाबरता लसीकरणासाठी पुढे येणे आवश्यक आहे.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम