वाशिम : राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांची व बंजारा समाजाची विविध माध्यमांवर होत असलेली बदनामी थांबवून संजय राठोड यांना पूर्वपदावर घेण्याची मागणी वाशिम तांड्याचे नायक दिलीपराव जाधव यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी निवेदनही देत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
निवेदनात असे नमूद आहे की, महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय राठोड यांच्यासोबत बंजारा समाजाची मोठ्या प्रमाणात बदनामी चालविली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. मात्र मागील काही महिन्यांपासून विरोधी पक्षातील नेत्यांनी, विविध माध्यमांनी संजय राठोड यांची जाणीवपूर्वक बदनामी चालविली आहे. हा प्रकार थांबवून संजय राठोड यांना पूर्वीच्या पदावर घ्यावे या मागणीसाठी समाजाकडून २७ ऑगष्ट, २०२१ रोजी धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला असून, या धरणे आंदोलनास पोहरादेवी संस्थानचे प्रमुख बाबूसिंग महाराज यांच्या उपस्थितीत, तसेच पोहरादेवी येथील सर्व महंत, जिल्ह्यातील सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.