काजळेश्वर उपाध्ये : येथून जवळच असलेल्या जानोरी या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले. त्यात गावकऱ्यांच्या परिश्रमामुळे येथील ई-क्लासवर वन उद्यान बहरले आहे. या वन उद्यानासह इतर प्रकल्पांचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आले.
जानोरी या लहानशा खेडेगावाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी २५ जानेवारी रोजी संध्याकाळी भेट दिली. यावेळी समृद्ध गाव स्पर्धेत गावकरी राबवत असलेल्या उपक्रमांचे अवलोकन त्यांनी केले. समृद्ध गाव स्पर्धेत जानोरी गावाचा समावेश आहे. या स्पर्धेत ग्रामपंचायत, पाणी फाऊंडेशन आणि गावकऱ्यांच्या समन्वयातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यात शेतकरी तसेच गावकऱ्यांसाठी उपयुक्त प्रकल्प तसेच गाव पाणीदार करण्यासाठी संपूर्ण गावात महिला बचतगट, महिला मंडळासह गावकऱ्यांनी राबविलेल्या सर्व उपक्रमांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री भारावून गेले. येथील वन उद्यानाला पालकमंत्र्यांचेच नाव देण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार प्रकाश डहाके, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी तापी, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे, शिवसेना तालुकाध्यक्ष विष्णू तिडके, पंचायत समिती सभापती वंदना रोकडे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव डोंगरदिवे, आशिष दहातोंडे, चंद्रकांत डोईफोडे, पंचायत समिती सदस्य रंगराव धुर्वे, डॉ. प्रा. नितीन भिंगारे, ज्योती गणेशपुरे, सरपंच भारती भिंगारे, माजी सरपंच रमेश पा. भोंगारे, पोलीस पाटील विनोद भिंगारे, पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक नानवटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश भिंगारे यांनी केले तर पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक लोखंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसचिव गजानन उपाध्ये, तलाठी संजय आडे, कृषी सहाय्यक चंदन राठोड, घाडगे पाटील, शिवा बोदळे, अमोल भिंगारे, अनिरुद्ध ताठे यांनी योगदान दिले.
----
विविध योजना राबविण्याची मागणी
जानोरी गावाचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश करावा, गावासाठी मंजूर धरणाचे काम सुरु करावे, उखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करावे, आदींसह गाव पालकमंत्री ग्राम दत्तक योजनेत दत्तक घेण्याची मागणी प्रा. डॉ. नितीन भिंगारे यांनी केली. या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार असून, गावचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी पालकमंत्र्यांनी यावेळी दर्शविली.