वाशिम: लोकसभेच्या निकालासाठी काऊंटडाऊन सुरू झाल्याने उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. यवतमाळ- वाशिम मतदार संघात अत्यंत काट्याची लढत झाल्याने येथील निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अपेक्षित कौल मिळावा म्हणून आता उमेदवारांनीही देव पाण्यात घातले आहेत. पैजा व सट्टाबाजारही जोरात चालू झाल्याने सर्वांचे लक्ष आता या निकालाकडे लागले आहे. काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे व शिवसेनच्या उमेदवार खासदार भावनाताई गवळी यांच्यातील या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्याचे मंत्री म्हणून मोघे यांच्यासह अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांचीही प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे. दुसरीकडे भावना गवळी यांच्यासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांबरोबरच खुद्द पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी प्रचारात भाग घेतल्याने, महायुतीच्यादृष्टीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. या दोन्ही उमेदवारांशिवाय बहुजन समाज पक्षाचे बळीराम राठोड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजु पाटील राजे या उमेदवारांनीही जोरदार प्रचार करून निवडणुकीत रंगत आणली आहे. या सर्व उमेदवारांना किती मते मिळणार आणि त्याचा कोणत्या उमेदवाराला फटका बसणार, यावरूनही तर्कवितर्क लढविले जात आहेत. येत्या १६ मे रोजी निकाल लागणार असल्याने उमेदवारांनी देवाला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. काट्याच्या लढतीमुळे या मतदार संघात मोठय़ा प्रमाणावर पैजा व सट्टा लागला आहे. लाखो रुपयांचा डाव निकालावर खेळला जात आहे. एकूणच निकालापूर्वी राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे.
उत्सुकता शिगेला, उमेदवारांचे देव पाण्यात!
By admin | Updated: May 14, 2014 00:29 IST