वाशिम : पार्डी टकमोर प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन कर्मचार्यांनी रजेच्या कालावधीतील बोगस प्रवास भत्ता प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश (कोर्ट २) यांच्या न्यायालयात पोहोचले आहे. उद्या, १३ मे रोजी या प्रकरणी सुनावणी होत असल्याची माहिती अँड. मोहन गवई यांनी दिली आहे. पार्डीटकमोर प्राथमिक आरोग्य केंद्रातील मो. हातम शेख, एच.पी. सातपुते, एन.पी. धंदरे या कर्मचार्यांनी रजेच्या कालावधीत प्रवास भत्ता काढला का? याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड यांनी माहिती अधिकारात मागितली होती. यानुसार सदर कर्मचार्यांनी रजेवर असतानाही प्रवास भत्ता काढल्याचा प्रताप समोर आला होता. या कर्मचार्यांचे प्रवास भत्त्याचे बिल वैद्यकीय अधिकार्यांच्या स्वाक्षरीने मंजूरही झाले होते. याबाबत ह्यलोकमतह्णने सर्वप्रथम ७ मार्च रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष वेधले. लोकमत वृत्तानंतर चौकशीच्या प्रक्रियेने वेग पकडला. मात्र मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने केवळ भत्त्या काढणार्या कर्मचार्यांकडूनच भत्त्याची रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्यात आली होती. रजेच्या कालावधीत प्रवास भत्ता काढणार्यांवर कडक कारवाई होणे माहिती अधिकार कार्यकर्ते भगवान गायकवाड यांना अपेक्षीत होते. मात्र, केवळ प्रवास भत्त्याची रक्कम वसूल करणे आणि वैद्यकीय अधिकार्यांना या कारवाईतून वगळणे या कारवाईच्या बाबी संशयास्पद वाटल्याने गायकवाड यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश (कोर्ट २) यांच्या न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. उद्या १३ मे रोजी या प्रकरणी सुनावणी होत आहे. या प्रकरणातील आरोग्य कर्मचारी व वैद्यकिय अधिकार्यांना हजर राहण्याबाबतच्या नोटीस पाठविलेल्या आहेत, अशी माहिती अँड. गवई यांनी दिली आहे.
बोगस प्रवास भत्ता प्रकरण पोहोचले न्यायालयात!
By admin | Updated: May 12, 2014 23:21 IST