यशवंत हिवराळे/राजुरा (बुलडाणा) मालेगाव तालुक्यातील बहुतांश आदिवासी समाजबांधवांच्या उपजीविकेचे मुख्य साधन असलेल्या ह्यभिलावाह्ण उद्योगाला संबंधितांच्या दुर्लक्षित धोरणामुळे अखेरची घरघर लागली आहे. आर्थिक पाठबळाअभावी केवळ रोजंदारी कामाच्या भरवशावर आदिवासी समाजबांधवांच्या संसाराची पुरती परवड होत आहे. मालेगाव तालुक्यातील राजुरा, मेडशी, पांगरी नवघरे, किन्हीराजा व डोंगरकिन्ही जिल्हा परिषद स्कूलच्या भागात बहुसंख्येने आदिवासी समाजबांधवांची वस्ती आहे. त्यामुळे भिलावा उद्योगाला चालना मिळण्यास या भागात पुरेसा वाव आहे. या सर्कलचा बहुतांश भूभाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. जंगलातील भिलाव्यांच्या भरवशावर अनेक पिढय़ांचा चरितार्थ चालत आला आहे. पूर्वी या जंगलातून मोठय़ा प्रमाणावर तेंदुपत्ता व भिलावा मिळत असे. काळाच्या ओघात या भागातील तेंदुपत्ता व भिलावा जणू नामशेष झाल्याने या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. मध्यंतरी काहींनी परराज्यातून भिलावा आणून या उद्योगाला जिवंत ठेवण्याची धडपड केली; परंतु मागणी व पुरवठय़ाची खर्चिक तालमेल व पुरेसे आर्थिक बळ नसल्याने या प्रयोगावर पाणी फेरले गेल्याने अनेक कुटुंबांना रोजगारासाठी गाव सोडण्याची वेळ आली होती. आज घडीस या उद्योगाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तालुक्यातील काही गावातील रोजंदारांकडून भिलाव्यातील गोडंबी काढणे, भिलाव्याचे तेल काढण्याचा उद्योग सुरू केला. दिवसाकाठी क्विंटलाने गोडंबीचे उत्पादन व शेकडो लिटर भिलावा तेलाचे उत्पादनाद्वारा लाखो रुपयाची उलाढाल दिवसाकाठी या उद्योगातून होताना दिसत आहे; मात्र याचा फायदा मूठभर लोक घेत असल्याचे दिसून येते. शासनाने या उद्योगासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री, पुरेसे आर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील वाकळवाडी, भामटवाडी, गांगलवाडी, पिंपळवाडी, देवठाणा, भौरद, भिलदुर्गा, अमानी, कवरदरी, कुत्तरडोह, यांसारख्या गावात रोजंदारीवर अल्प मोबदल्यात भिलावा फोडणे व तेल काढण्याचे काम सुरू आहे. वाकळवाडी येथे शंभरावर महिला-पुरुष दर दिवशी भिलावा उद्योगात काम करताना दिसतात.
भिलावा उद्योगाला अवकळा!
By admin | Updated: February 25, 2016 01:49 IST