वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा व चौकाच्या सौंदर्यीकरण बांधकामाचा लपंडाव अजूनही सुरूच आहे. बांधकामाला गती देण्याचा नगर परिषद प्रशासनाचा दावा सपशेल फोल ठरला आहे. २0११ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्या पुढाकाराने स्थानिक नगर पालीका प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व सदर चौकाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी ३५ लाख ७९ हजार ६२२ रूपयांचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र जिल्हा नियोजन विभागाने या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरात प्रदान करण्याऐवजी लालफितीत गुंडाळृन ठेवले होते. याबाबत आंबेडकरी अनुयायांनी नगर परिषद प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. १४ एप्रिल २0१२ रोजी डॉ. बाबासाहेबांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकार्यांनी ६ डिसेंबरपर्यंत काम सुरू झालेले असेल असे सुतोवाच केले होते. २0१२ च्या ६ डिसेंबरपर्यंत या कामाला प्रशासकीय मंजुरातही मिळु शकली नव्हती. त्यामुळे आंबेडकारी अनुयायांच्या पदरी निराशाच पडली होती. त्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशाराही दिला. गत दहा महिन्यांपूर्वी १७ लाख रुपयांच्या कामाचे अंदाजपत्रक तयार केले. त्याला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरातही मिळाली आहे. या १७ लाखातून बांधकाम होणार आहे. कामाची निविदा तीन वेळा काढण्यात आली होती. त्यावेळी प्रतिसाद न मिळाल्याने चवथ्यांदा निविदा काढण्यात आली. १२ डिसेंबर २0१३ रोजी या कामाचा रितसर शुभारंभही करण्यात आला. मात्र, तीन महिन्यात पुतळा व चौकाभोवती पांढर्या रेषा मारणे आणि ताटवे लावणे या पलिकडे बांधकामाने टप्पा ओलांडला नाही. निधी मंजूर असतानाही महापुरुषांच्या पुतळा व चौकाच्या सौंदर्यीकरण बांधकामाला विलंब लागणे ही बाब दप्तर दिरंगाईचे द्योतक असल्याच्या प्रतिक्रिया अनुयायांमधून व्यक्त होत आहे.
बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण बासनात
By admin | Updated: June 25, 2014 01:39 IST