अनसिंग : परिसरातील बहुतांश गावांमध्ये अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेल्या बोगस डॉक्टरांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हास्तरीय समिती टाळाटाळ करीत असल्याने कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप होत आहे. शासनाच्यावतीने ग्रामीण भागात आरोग्य केंद्र व उपकेंद्र उघडले जात आहे. मात्र, तरीही अनेक गावांमध्ये अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र नसणारे काही डॉक्टर रुग्णांची तपासणी करीत असल्याचे दिसून येते. काही गावात आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र नसतात. नेमकी हीच बाब बोगस डॉक्टरांच्या पथ्यावर पडत आहे. बोगस डॉक्टरांनी अशा दुर्गम खेड्यांची निवड करून आपले दुकान थाटले असल्याचे चित्र अनसिंग परिसरात आहे. महाराष्ट्रात कोठेही अँलोपॅथीचा वैद्यकीय व्यवसाय करावयाचा झाल्यास इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमाणपत्र आवश्यक असते. आयुर्वेदिक आणि होमिओपथी या प्रकारच्या वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांना संबंधित कौन्सिलकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. परंतु, अशा प्रकारचे कोणतेही प्रमाणपत्र नसताना अनेक खेड्यांमध्ये बोगस डॉक्टर्स आपला व्यावसाय करीत आहेत. यातील अनेक डॉक्टर्स असाध्य रोगावर खात्रीलायक इलाज करणारे आहेत तर काही डॉक्टर्स यापुर्वी शहरातील मोठमोठय़ा डॉक्टरांकडे कंपांडर म्हणून नोकरी करीत होते. अशा बोगस डॉक्टरांना शोधून काढण्याची मोहिम शल्यचिकित्सकांनी राबविणे गरजेचे आहे.
बोगस डॉक्टरांवरील कारवाईस टाळाटाळ
By admin | Updated: July 6, 2014 23:25 IST