वाशिम : ऑटो, अँपे किंवा व्हॅनऐवजी स्कूल बसद्वारेच विद्यार्थ्यांची वाहतुक करण्याचा फतवा वाहतुक शाखेने काढल्याने, बिथरलेल्या ऑटोचालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. २१ जुलै रोजी ऑटोचालक संपावर गेल्याने पाल्यांबरोबरच पालकांचीदेखील 'शाळा' भरली. शाळांचे मार्ग ऑटो, व्हॅनऐवजी मोटारसायकल व कारने फुलून गेले होते. २६ जूनपासून वाशिम जिल्ह्यात शाळांना प्रारंभ झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ऑटो, व्हॅन व अँपेमधून विद्यार्थ्यांची वाहतुक केली जात आहे. उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतुक शाखेने ठरवून दिलेल्या नियमानुसार सदर वाहतुक सुरू होती. अलिकडच्या दिवसात मात्र शहर वाहतुक शाखेने ऑटो, व्हॅन व अँपेऐवजी स्कूल बसनेच विद्यार्थ्यांची वाहतुक करण्याचा फतवा काढला असल्याचा आरोप ऑटोचालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांची वाहतुक करणार्या ऑटोरिक्षांवर वाहतुक शाखेने कारवाईचा धडाका लावल्याने भयभीत झालेल्या ऑटोचालकांनी संप पुकारला आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून शहरातील ऑटोरिक्षा चालक शाळकरी मुलांची ने-आण करण्याचे काम करीत आहेत. शहर वाहतुक शाखेने एकीकडे प्रवासी ऑटोचालकांना मुकसंमती देऊन शाळकरी ऑटोचालकांना 'टार्गेट' करणे सुरू केल्याचा आरोपही शाळकरी ऑटोचालकांनी केला. क्षमतेपेक्षा अति विद्यार्थ्यांची वाहतुक करणार्या ऑटोरिक्षांवर कारवाई होणे अपेक्षीत आहे. मात्र, नियमानुसार विद्यार्थ्यांची वाहतुक होत असेल तर स्कूल बसचा आग्रह कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुरेशा प्रमाणात स्कूल बसेस नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ऑटो चालकांवर कारवाई सुरु झाल्याने नियम न पाळणार्या ऑटोचालकांचे धाबे दणाणले आहे. ** चिमुकल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितताही महत्त्वाची नर्सरी, केजी वन व केजी टु मध्ये शिकणारे चिमुकले ऑटोमधूनच शाळेत जातात. काही ऑटोंमध्ये १0-१२ पेक्षाही अधिक विद्यार्थी बसविले जातात. शिवाय विद्यार्थ्यांचे दप्तर ऑटोच्या दोन्ही बाजूने लटकविले जाते. यामुळे अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ** ऑटोचालकांची प्रशासनासोबत चर्चा ऑटोचालकांनी प्रथम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्याशी चर्चा केली. यावेळी नियमानुसार परमिट असलेल्या ऑटो, अँपेमधून विद्यार्थ्यांची वाहतुक करण्याला आमचा विरोध नसल्याचे नेरपगार यांनी ऑटोचालकांना सांगितले. त्यानंतर ऑटोचालकांनी शहर वाहतुक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्याशी चर्चा केली. पवार यांनी परमिट असलेल्या ऑटो किंवा स्कूल बस मधूनच विद्यार्थ्यांंची वाहतुक करण्याचे सांगितले. जिल्हाधिकार्यांशीदेखील ऑटोचालकांनी चर्चा केली. मात्र योग्य तोडगा निघू शकला नाही. ऑटोचालक आणि वाहतुक शाखेतून तोडगा निघाला नसल्याने ऑटोचालकांनी अघोषित संप पुकारला आहे. यामध्ये पालकांची मात्र तारांबळ उडत आहे.
ऑटोचालक संपावर; पालक शाळेवर
By admin | Updated: July 21, 2014 23:06 IST