वाशिम : ग्रामीण रुग्णालयांतून उपजिल्हा तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयांत रुग्णांना रेफर करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. २०१९ मध्ये ८९० महिलांना प्रसूतीसाठी रेफर केले होते. २०२० मध्ये जवळपास ९७० महिलांना जिल्हा सामान्य रुग्णालय व अन्य सरकारी रुग्णालयांत रेफर करण्यात आले.
अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नाहीत. ग्रामीण रुग्णालयात जोखीम गटातील महिलांच्या प्रसूतीसाठी आवश्यक ती सुविधा व तज्ज्ञ डाॅक्टर पुरेशा संख्येत उपलब्ध नाहीत. त्यामुळे जोखीम गटातील गर्भवती महिलांना ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे किंवा जिल्हा सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे रेफर केले जाते. यामधील काही रुग्ण हे खासगी दवाखान्यातही दाखल होतात. मात्र, याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. २०१९ मध्ये जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमधून ८९० महिलांना प्रसूतीसाठी अन्य सरकारी रुग्णालयांत रेफर केले होते, तर २०२० मध्ये ९७० महिलांना रेफर करण्यात आले. सिझेरिअनची व्यवस्था शक्यतो जिल्हा सामान्य रुग्णालयात असल्याने सिझेरिअनसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रेफर करण्यात येते. सहा ग्रामीण रुग्णालय मिळून जवळपास १७५६ महिलांची नाॅर्मल प्रसूती झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात पुरेशा प्रमाणात आरोग्यविषयक सुविधा आणि तज्ज्ञ डाॅक्टर उपलब्ध असणे आवश्यक ठरत आहे.
००
२०२० मध्ये मानोरा ग्रामीण रुग्णालयात २१२ महिलांना प्रसूतीसाठी अन्य सरकारी रुग्णालयांत रेफर करण्यात आले. २८५ महिलांची प्रसूती नाॅर्मल झाली आहे. ग्रामीण रुग्णालयातून सरकारी रुग्णालयांतच रुग्णांना रेफर करण्यात येते. ग्रामीण रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर संबंधित रुग्ण हा संदर्भित सरकारी रुग्णालयात गेला की खासगी रुग्णालयात दाखल झाला, याची माहिती नसते.- डॉ. वैभव खडसे,
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मानोरा
००