सिंदखेडराजा : जनसामान्य लोकात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्यावतीने ५१ गावात पोलिस सुरक्षा मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे कायदा व सुरक्षा धोक्यात आणणार्या अनेक गोष्टींना चाप बसणार आहे. साखरखेर्डा येथे महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, ज्ञानगंगा मार्गदर्शन केंद्र, बसस्थानक, गुजरी चौक, आठवडी बाजार या वर्दळीच्या ठिकाणी नेहमीच चुटफुट घटना घडतात. फेसबुकवर अश्लील फोटो टाकणे, टिका टिपण्णी करणे, नको तो संदेश लोड करुन धार्मिक भावना भडकावणे, इंटरनेटचा गैरवापर करणे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी सिमकार्ड विक्रेत्यांनी खरेदीदार ग्राहकांचे रजिस्टर मेंटन करणे, कित्येक वेळा युवक सिमकार्डचा गैरवापर करुन ते सिमकार्ड वापरानंतर फेकून देतात. त्यामुळे आरोपींना पकडण्यात वेळ लागतो. यासाठी रजिस्टर मेन्टन्स करणे महत्वाचे आहे. एका व्यक्तीला एकच सिमकार्ड बंधनकारक असावे, असाही सूर बैठकीतून निघाला. सण, उत्सव, जयंती या दरम्यान समाज विघातक लोक अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दोन्ही समाजात भावनिक वातावरण लोप पावते. यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी, प्रत्येक व्यक्तींनी अशा समाजविघातक व्यक्तींपासून सावध राहून पोलीसांना सुचना द्याव्यात. नेहमीच पुतळा विटंबनाचे प्रकार घडतात. त्यासाठी पुतळा समिती स्थापन करुन प्रत्येकठिकाणी संरक्षण कठडे उभारावे. यासाठी तंटामुक्त समितीने पुढाकार घ्यावा, असाही प्रस्ताव मांडण्यात आला. आठवडी बाजार, गुजरी चौक, बसस्थानक याठिकाणी चिडीमारीचे प्रकार वाढत आहेत. चोरट्यांपासून सावधानता बाळगावी यासाठी ११ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावणे अपेक्षीत आहे. शिक्षक कॉलनी मेनरोडवर राहणारे नागरिक यांनी आपल्या घरासमोर रात्रीच्यावेळी लाईट लावणे महत्वाचे आहे. या बाबींवर शांतता कमिटी मिटींगमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर भाडेकरुंना घर भाड्याने देतांना त्याची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला देणे गरजेचे आहे. पोलीस सुरक्षितता मोहिमेसाठी जनतेने सहकार्य करावे. जेणेकरुन कोणत्याही घटनेचा उलगडा त्वरीत होईल, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
५१ गावांत पोलिस सुरक्षा मोहीम
By admin | Updated: July 25, 2014 00:10 IST