वाशिम : सुरक्षित प्रवास म्हणून सर्वसामान्य नागरिक एस.टी.ला सर्वाधिक पसंती देतात. गतवर्षभरात जिल्ह्यात एस.टी. अपघाताच्या ११ घटना घडल्या असून, सुदैवाने यामध्ये एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही.
जिल्ह्यात वाशिम, कारंजा, मंगरूळपीर व रिसोड असे चार आगार आहेत. सुरक्षित प्रवास, वाहतूक नियमांचे पालन आदीसंदर्भात दरवर्षी रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा केला जातो. सध्या हा पंधरवडा साजरा केला जात असून, खासगी वाहनाच्या तुलनेत एस.टी. चा प्रवास थोडा सुरक्षित असल्याचे सर्वसामान्य प्रवाशांना वाटते. गत वर्षभरात जिल्ह्यात एस.टी. अपघाताच्या ११ घटना घडल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. सर्वाधिक अपघात रिसोड आगारांतर्गत येणाऱ्या पाच बसचे झाले आहेत.
००
गतवर्षी १३ अपघात
२०१९ मध्ये जिल्ह्यातील चार आगारांतर्गत येणाऱ्या १३ एस.टी. बसचे अपघात झाले होते. तांत्रिक बिघाड, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, रस्त्यावरून खड्डे, समोरच्या वाहनाला वाचविण्याचा प्रयत्न आदी कारणांमुळे अपघात घडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत २०२० मध्ये अपघाताच्या दोन घटनांमध्ये घट आल्याचे दिसून येते.
००
वाशिम आगारांतर्गत सुरक्षित प्रवासासाठी चालकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. २०२० मध्ये वाशिम आगारांतर्गत एस.टी. अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत.
- विनोद इलामे, आगार व्यवस्थापक
००
कोरोनामुळे सत्कार समारंभ नाही
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने यंदा बस चालक, वाहकांचा सत्कार समारंभ जिल्ह्यातील एकाही आगारात घेण्यात आला नाही. रस्ता सुरक्षा पंधरवड्यानिमित्त सुरक्षित प्रवासाबाबत चालकांना मार्गदर्शन केले जात आहे.
००
जिल्ह्यातील एसटीचालक ४२६
०००