पंकज राऊत, बोईसरतारापूर एमआयडीसी ते नवापूर खाडीपर्यंत रासायनिक पाणी वाहून नेण्यासाठी टाकण्याकरीता आणलेल्या तीन एचडीपीइचे पाईपला आज आग लागली. ती लावली की लागली याबाबत संदिग्धता असून ही आग दोन अग्निशामक बंबांनी विझविली. या आगीमध्ये शेजारच्या शेताचे कुंपण व फळझाडेही जळाले असून या संदर्भात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया कंत्राटदारामार्फत सुरु आहे.तारापूर एमआयडीसी मधून नवापूर समुद्रात सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्याच्या जुन्या आरसीसी पाईप लाईनला तीस ते पस्तीस वर्ष झाल्याने ती झिजल्याने वारंवार फुटत असल्याने कुंभवली नाका ते नवापूर खाडी अशी चार किमी लांबीची पाइपलाइन टाकण्याचे काम एमआयडीसी ने रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरला दिले असून प्रशांत संखे यांच्यामार्फत खोदाई करुन पाइपर्लान टाकण्याचे काम सध्या सुरु आहे.सध्या तीन किमी पर्यंत रस्ता खोदण्यात आला असून सुमारे आठशे मिटर पर्यंत पाइप टाकून पूर्ण झाले आहेत काल पहाटे चारच्या सुमारास पाम - टेंभी नाक्या जवळील रस्त्यावरील बाराशे एमएमच्या तीन एचडीपीई पाइपला लागलेल्या आगीचे खरे कारण पोलीस तपासातच समोर येईल तर काही दिवसापूर्वी नवापूरच्या खोल समुद्रात टाकण्यात येणाऱ्या पाइपलाइनचे काम मच्छिमारांच्या काही गटाने विरोध दर्शवून बंद पाडले होते.या आगीमुळे मोरेश्वर पिंपळे व वासुदेव पिंपळे यांनी त्यांच्या वाडीतील फळझाडे, केळी, कंपाऊंड, भंगार जळून गेल्याचे पत्र एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे तर आगीच्या ज्वालामुळे वीज वाहक ताराही जळून कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.
तारापूरला सांडपाण्याचे पाईप खाक
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST