विरार : वसई - विरार महानगरपालिकेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यापूर्वी महापालिकेची पूर्वपरवानगी घेण्यात यावी असे पत्र महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांसह तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यांना दिले आहे. त्यावरुन वादंग उठला असून आयुक्तांच्या भूमिकेमुळे भ्रष्ट अधिकारी - कर्मचाऱ्यांना मोकळे रान मिळेल, असा आरोप करण्यात आला आहे.गेल्या सहा महिन्यात वसई - विरार महानगरपालिकेच्या सुधाकर संख्ये, निलम निजाई आणि स्मिता भोईर तीन सहाय्यक आयुक्तांवर अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. यातील संख्ये यांना निलंबित करण्यात आले आहेत. पालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांविरोधात अनेक तक्रारी येत असून पोलीसही कारवाई करु लागले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त लोखंडे यांनी अधिकारी - कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यापूर्वी पालिकेची परवानगी घ्यावी असे पत्र पोलिसांना पाठवले आहे. महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारतीय दंड संहितेअंतर्गत गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले तरी आयुक्त अशा पध्दतीने पोलिसांना पत्र देतील का? असा सवाल गावडे यांनी उपस्थित केला आहे. या कायद्याच्या कलम १४२ नुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर केवळ एमआरटीपी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा असल्यास महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र भारतीय दंड संहिते संदर्भातील गुन्हे असल्यास पोलिसांकडून थेट व कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे गावडे यांनी म्हटले आहे.आयुक्त सतिश लोखंडे यांचे हे पत्र सुस्पष्ट नसल्याने पोलीस दलात संभ्रम निर्माण होईल आणि महानगरपालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी याचा गैरफायदा घेतील याकडे धनंजय गावडे यांनी लक्ष वेधले आहे. तसेच एमआरटीपी अॅक्टचा प्रभावी वापर करण्यासाठी दिनांक १७ फेब्रुवारी, २०११ रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातील मार्गदर्शक सूचनांचा दाखला देत आयुक्तांनी केवळ एमआरटीपीचे गुन्हे दाखल करतानाच पोलिसांनी महानगरपलिकेची परवानगी घ्यावी. मात्र भारतीय दंड संहिते संदर्भातील गुन्हे असल्यास पालिकेच्या परवानगीची वाट न पहाता थेट कारवाई करण्यासंदर्भात आयुक्तांनी पोलिसांना सुस्पष्ट पत्र द्यावे, अशी मागणी धनंजय गावडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
गुन्हे दाखल करण्यापूर्वी परवानगी घ्या
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST