- शशी करपे, वसर्ईविहिरी आणि बोअरवेलमालकांना पाणी विकण्यास मनाई करताना टँकरमालकांना टँकरने पाणी विकण्यावर वसईच्या तहसीलदारांनी बंदी घातली आहे. तालुक्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन विहिरी आणि बोअरवेलमालकांना तलाठ्यांमार्फत नोटिसा बजावण्यात आल्या असून कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या वसई तालुक्यात सुमारे ६५० टँकर पाणीपुरवठा करीत असून सर्वाधिक नालासोपारा शहरात आहेत. ही बंदी कायम राहिली तर वसईत पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येते.वसई तालुक्यात अनेक भागांत सध्या पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. त्यामुळे टँकरचा धंदा तेजीत आला आहे. मात्र, टँकरचालक बेसुमार उपसा करीत असल्याने सतत वाद होत असतो. पश्चिम पट्ट्यातून टँकरला बंदी घालण्यात आल्याने सध्या पूर्व पट्टीतील वालीव, धानीव, पारोळ, पेल्हार, उसगाव, तानसा, भालिवली, खानिवडे, शिवनसई, चंदनसार, भाटपाडा, फुलपाडा, मनवेलपाडा. उसगाव, उसगाव नदी आदी ठिकाणांहून विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीउपसा सुरू आहे. त्या भागातही यंदा पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. त्यामुळे तेथील विहिरी आणि बोअरवेलची पातळी प्रचंड खालावली आहे. म्हणूनच, स्थानिक गावकऱ्यांनी टँकरने पाणीउपसा करण्याला विरोध केला आहे. याप्रकरणी अनेक तक्रारी आल्यानंतर वसईचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांनी टँकरमालकांना पाणीउपसा करण्यावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर विहीर आणि बोअरवेलमालकांना पाणी विकण्यावर बंदी घातली आहे. तलाठ्यांमार्फत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. बंदी मोडून पाणीविक्री केली गेली तर कारवाईचे आदेशही तहसीलदारांनी तलाठ्यांना दिले आहेत. त्यामुळे टँकर लॉबीचे धाबे दणाणले आहे. टँकरच्या पाणीपुरवठ्यावर बंदीचे वसईत स्वागत केले जाते. कारण, याआधी टँकरविरोधात वसईत मोठमोठी आंदोलने होऊन वसईत कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा इतिहास आहे. मध्यंतरी १०-१५ वर्षे वसईकरांची टँकरच्या जाचातून मुक्तता झाली होती. पण, गेल्या तीन-चार वर्षांपासून टँकर लॉबीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सध्याची स्थिती पाहता टँकरने पाणीपुरवठा बंद झाल्यास लोकांना पाणीटंचाईची तीव्र समस्या भेडसावणार आहे. सध्या तालुक्यात किमान ६५० हून अधिक टँकर पाणीपुरवठा करतात. एकेक टँकर दिवसाला किमान चार ते पाच फेऱ्या मारतात. सर्वाधिक ३५० हून अधिक टँकर एकट्या नालासोपारा शहरात धंदा करतात. एकट्या नालासोपारा परिसरातील किमान ५० हजार कुटुंबे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. नव्या वसाहती, चाळी आणि झोपडपट्ट्यांना नळकनेक्शन नाही. त्यामुळे तालुक्यातील किमान ७० ते ७५ हजार कुटुंबे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सध्या पालिका हद्दीत १०० एमएलडी पाणी कमी आहे. टँकर बंद झाल्यास इतक्या मोठ्या लोकसंख्येला पाणीपुरवठा कसा करायचा, या बिकट प्रश्नाचा सामना पालिकेला करावा लागणार आहे.वळवीपाड्यात पाणीटंचाई- वाडा तालुक्यातील वळवीपाडा येथील आदिवासी महिलांना बारमाही पाण्यासाठी लांबचलांब पायपीट करून ओहळातील, डबक्यातील पाणी आणावे लागत आहे. मार्च पासून ही भीषणता वाढली आहे. तालुक्यातील पिंजाळ, देहर्जे, गारगाई, तानसा, वैतरणा अशा पाच बारमाही वाहणाऱ्या नद्यांची देणगी निसर्गाने दिली आहे. शासकीय अनास्थेमुळे व लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे ४० वर्षांपासून येथील गावपाड्यांच्या घशाला कोरड पडली आहे. या गावातील ग्रामस्थ संतोष वळवी, रोहन वळवी, पंढरी वळवी, आत्माराम वळवी, वसंत वळवी, नकुल वळवी, काशिनाथ वळवी, बापू वळवी, संजय वळवी यांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार अर्ज-विनंत्या, हेलपाटे मारूनदेखील साधा हातपंपदेखील मिळत नसल्याने ते भ्रमनिराश झाले असून प्रशासनावरचा त्यांचा विश्वास उडाला आहे.इथे रस्ता, वीजप्रश्न जसेच्या तसेच असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून येथील महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरणे कठीण होऊन बसले आहे. निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून पाणीप्रशाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. सामाजिक कार्यकर्ते शुभम जाधव यांनी याप्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.दरवर्षीप्रमाणे उसगाव नदीतून पाणी उचलण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी टँकर असोसिएशनने तहसीलदारांकडे केली आहे. सध्या तरी तहसीलदारांनी ही मागणी अमान्य केली आहे. पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची असून पालिका प्रशासन त्याबाबतीत निर्णय घेईल, असे तहसीलदारांचे म्हणणे आहे. तहसीलदारांच्या कारवाईला घाबरून नालासोपारा टँकर असोसिएशनने मार्ग निघेपर्यंत टँकर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तहसीलदारांची टँकरबंदी
By admin | Updated: March 19, 2016 00:10 IST