दीपक मोहीते, वसईवसई-विरार मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. तिकिटासाठी ‘काय पन’ हा नारा दबक्या आवाजात घुमू लागला आहे. ‘निवडून न येऊ शकणाऱ्या पक्षाचे तिकट नको रे बाबा’ अशी कुजबूज सर्वत्र ऐकू येत आहे. तर दुसरीकडे विविध राजकीय पक्षाचे इच्छुक वसई जन आंदोलन समितीमधून घरवापसीच्या तयारीला लागले आहेत. यात सेनेच्या नेत्यांचा सर्वाधिक भरणा आहे. युतीला चांगले दिवस आल्यामुळे आपल्यालाही ‘अच्छे दिन आयेंगे’ अशा मनस्थितीत असलेले इच्छुक आता पक्षश्रेष्ठीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवू लागले आहेत.मनपाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सेनेच्या अनेक नेत्यांनी वसई जन आंदोलन समितीच्या (लोकहितवादी लीडर पार्टी) तिकिटावर निवडणुका लढवल्या. यात अनेकांनी विजयही मिळवला. मनपातील समाविष्ट गावांचा प्रश्न हा त्यावेळी प्रचारात कळीचा मुद्दा झाला होता. ग्रामीण भागातील जनतेची मते या भावनिक प्रश्नावर एकवटली व ग्रामीण भागात लोकहितवादी लीडर पार्टीला बऱ्यापैकी यश मिळाले. परंतु ते यश फार काळ टिकले नाही. विधानसभा, जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या पक्षाचा दारूण पराभव झाला व पक्षाची घसरण सुरू झाली. सलग झालेल्या पराभवाने पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह अन्य पदाधिकाऱ्यांचे मनोधैर्य पूर्णपणे खचले. लवकरच होणाऱ्या मनपा निवडणुकीमध्ये या पक्षाच्या नेत्यांनी स्वारस्य न दाखवल्यामुळे अनेक नेते व पदाधिकारी आता घरवापसीच्या मार्गावर आहेत. अनेक नेत्यांनी सेनेकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर मनसेचे नेतेही आता सेनेच्या वाटेवर आहेत. जुन्या पक्षाची साथ, राजकीय विकास अशा निर्णयाप्रत ही मंडळी आली आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्याने अनेक दिग्गज नगरसेवकांचे राजकीय भवितव्य अंधारात सापडले आहे. राजकीय पक्षंनी मात्र अभ्यासू तसेच जनमानसामध्ये चांगली प्रतिमा असणाऱ्या नगरसेवकांना सुरक्षित प्रभाग देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना स्थानिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.परत येणाऱ्यांना तिकीटे नकोत४घरवापसी करणाऱ्यांना पुन्हा तिकिट देण्यात येऊ नयेत असा एक मतप्रवाह असून सेनेचे काही पदाधिकारी तसेच कार्यकर्ते या संदर्भात मातोश्री दरवाजे ठोठावणार आहेत. गेल्या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक न लढवणाऱ्या नगरसेवकांना पुन्हा संधी देता काम नये अशी मागणी होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या अवस्था लक्षत घेत या दोघांना स्वबळावर निवडणूका लढवणे शक्य होणार नाही. त्यामुळे आ. ठाकूर यांच्याशी चर्चा करून प्रत्येकी दोन ते तीन जागा पदरात पाडून घेण्याचे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे प्रयत्न आहेत. ४प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचाही आ. ठाकूर यांच्याशी चांगला घरोबा आहे. त्यामुळे आ. ठाकूर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘जो कोणी सत्तेत असेल तो आपला मित्र’ हे नाते गेली १६ वर्षी पाळणारे आ. ठाकूर ऐनवेळी काय खेळी खेळतात यांवर निवडणुकीच्या लढतीचे चित्र अवलंबून आहे.
जनआंदोलनचे नगरसेवक घरवापसीच्या तयारीत
By admin | Updated: May 6, 2015 01:10 IST