मनोर : पालघर तालुक्यातील पूर्व मनोर परिसर आदिवासी भाग असल्याने पावसाळी भातशेती ही त्यांची अन्नदाता ठरते. मात्र यंदा पाऊस वेळेवर न पडल्याने काही गावात शेती होऊ शकली नाही तर काही भागात उशीरा शेती करण्यात आली. त्यामुळे यंदा दर्जेदार पीक येण्याची शक्यता कमी दिसत आहे. मनोर परिसरातील सावरे, ऐंबुरे, ढेकाळे, हलोली, दुर्वेस, निहे, नागझरी, मासवण, धुकटन, सावरखंड, पोळे, केव असे शंभर सव्वाशे गावे दऱ्याखोऱ्यात डोंगराच्या बाजूला वसलेले असून ८० टक्के आदिवासी, २० टक्के कुणबी व इतर समाजाचे बांधव या परिसरात राहत असून भातशेती हीच त्यांनी उपजिवीका आहे. यंदा जया, सुमा, रत्ना, एक काडी, कर्जत (३), असे विविध जातीचे बी-बियाणे पेरून ५० टक्के शेतकऱ्यांनी श्ोती केली. परंतु एक महिना पाऊस उशीरा पडल्याने काही शेतकरी लागवडीपासून वंचित राहीले.ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, तलाव, नदीकाठी शेती होती त्यांनी पंप लावून पेरणी केली होती. परंतु गरीब शेतकऱ्यांनी शेती केलीच नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी भातशेती लागवड केली आहे. त्यांना वेळेवर पाऊस न पडल्याने व हवामानात बदल झाल्याने त्यांनी लावलेल्या रोपांची वाढ झालीच नाही. या वातावरणामुळे पिकांवर रोग पडला असून भातशेतीचे नुकसान होण्याची दाट शक्यता दिसत आहे. याबाबत पालघर जिल्ह्याचे कृषी अधिक्षक डॉ. पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन रिसीव्ह केला नाही.कृषीविभागाकडून सावरे ऐंबुरे परिसरातील शेतकऱ्यांना इंधनपंप, बांधबंदीस्ती, बंधारे, बांधण्यात आले त्यामुळे तेथील अनेकांनी बंधाऱ्याच्या पाण्यावर भात लागवड केली. या काळात भात बियाणे कृषी खात्याकडून मोफत वाटप करण्यात आले त्यामुळे यंदा कृषी विभागाकडून आम्हाला भरपूर मदत मिळाली आहे. परंतु निसर्गाच्या वातावरणामुळे पुढे शेतीवर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. असे सावरे ऐंबुर गावचे शेतकरी कुमार पाटील यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)शेतीचाच आधार...मनोर परिसरात रोजगाराचा बोजवारा आहे. त्यामुळे येथील लोकांना पावसाळी शेतीवर अवलंबून राहावे लागते. भातशेतीतून भाताची विक्री केली जाते. त्यातून आलेल्या पैशातून आलेल्या पाहुण्यांची उठबस, स्वागत केले जाते. तसेच पावली पेंढा सणासुदीत विक्री करून सण साजरे केले जातात. मूळ उपजिविकेचा गाभा ही भातशेती आहे मात्र निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे पीकावर बाधा येते अशी परिस्थिती सध्या मनोर परिसरात आहे. त्यामुळे बळीराजा सैरभैर झाला आहे.
भातशेती संकटात!
By admin | Updated: August 25, 2015 22:43 IST