वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचा सफाया झाला होता. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद संख्येने कमी असलेल्या विरोधी पक्षाकडे देण्यास सत्ताधारी पक्षाचा विरोध दिसून येत आहे. सभागृहात सेना- ५, भाजपा- १ व अपक्ष- ३ असे ९ जण विरोधी पक्षामध्ये आहेत. या ३ पैकी २ नगरसेवक मूळचे बहुजन विकास आघाडीचे आहेत. त्यांनी निवडणूक मात्र अपक्ष म्हणून लढवली होती. त्यामुळे विरोधी पक्षाकडे केवळ ८ नगरसेवकांचे समीकरण उरते.विरोधी पक्षाची ही केविलवाणी स्थिती लक्षात घेऊन सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने आपल्याच पक्षातील ९ नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करून विरोधी पक्षनेतेपदावर दावा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या गटाला कोकण आयुक्तांकडूनही परवानगी मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या या खेळीमुळे विरोधी पक्ष भांबावून गेला असून यासंदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर सध्या विचारविनिमय सुरू झाला आहे. हा राजकीय पेच उच्च न्यायालयात जाण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर बहुजन विकास आघाडीने प्रभाग समिती रचना करताना अशाच प्रकारची खेळी करत पाचही प्रभाग समित्या आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. तसेच स्वीकृत सदस्य निवडीमध्येही अशाच खेळीने विरोधी पक्षाला सत्ताधारी आघाडीला चारीमुंड्या चित केले होते. त्याचीच पुनरावृत्ती आता विरोधी पक्षनेतेपदाबाबत होताना दिसत आहे. (प्रतिनिधी)
विरोधी पक्षनेतेपदही सत्ताधारी गटाकडेच
By admin | Updated: August 15, 2015 22:41 IST