महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : राष्ट्रवादीचा ‘विक्रम’गड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 02:25 AM2019-10-25T02:25:45+5:302019-10-25T06:08:23+5:30

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विक्रमगड मतदारसंघात पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आणत राष्ट्रवादी- महाआघाडीचे उमेदवार सुनील भुसारा यांनी २१ हजार ३९९ मतांनी विजय मिळवला आहे.

NCP win vikramgad Constituency | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : राष्ट्रवादीचा ‘विक्रम’गड

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : राष्ट्रवादीचा ‘विक्रम’गड

googlenewsNext

- हुसेन मेमन

जव्हार : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विक्रमगड मतदारसंघात पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आणत राष्ट्रवादी- महाआघाडीचे उमेदवार सुनील भुसारा यांनी २१ हजार ३९९ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार आणि माजी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांचे सुपुत्र डॉ. हेमंत सवरा यांचा पराभव केला. तब्बल ४२ वर्षांनी काँग्रेस - राष्ट्रवादी महाआघाडीने येथे विजय प्राप्त केला आहे. यावेळी महाआघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी फटाके फोडीत, गुलाल उधळत आणि विजयी घोषणा देऊन लाडू आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे.

राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. ती २५ व्या फेरीपर्यंत कायम ठेवण्यात सुनिल भुसारा यांनी यश मिळवले आहे. सुनिल भुसारा यांना एकूण ८८ हजार ४२५ मते मिळाली आहेत. तर पराभूत उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांना ६७ हजार २६ मते मिळाली असून भुसारा यांनी २१ हजार ३९९ मताधिक्याने विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत स्थानिक विरूध्द परकीय हा मुद्दा मतदारांपुढे पोहोचिवण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरले. तर भाजप आणि शिवसेनेतील नाराज गटानेही सुनील भुसारा यांना मदत केल्याचे प्रत्येक तालुक्यातील मतांची आघाडी सांगते आहे. भुसारा यांनी जव्हारमधून १३ हजार तर मोखाड्यातून ८ हजार मताधिक्य घेतले आहे. तर भाजपचा अभेद्य असलेला गड विक्रमगड तालुका आणि वाडा तालुक्यातील कंचाड जिल्हा परिषद गटातही भाजपला रोखून धरत भुसारा यांनी ही आघाडी मिळविली आहे.

विशेष म्हणजे, भुसारा यांनी या संपूर्ण मतदारसंघात एकाही मोठ्या नेत्याची सभा घेतली नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे आणि बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या सभांचे नियोजन असूनही भुसारा यांनी सभांमध्ये वेळ तसेच पैसा न दवडता विकासाचा आणि स्थानिक विरूद्ध परकीय उमेदवाराच्या प्रचारावर भर दिला. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून सवरा कुटुंबाला असणारा विरोध प्रकर्षाने जाणवला आहे.

Web Title: NCP win vikramgad Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.