पारोळ : मार्क्सवादी गोदाताई परुळेकर विचार मंच व ठाणे, पालघर जिल्हा वीट उत्पादक मजूर व संबंधित व्यवसायीक संघटना हे संयुक्तपणे वीट उत्पादक व मजूर यांच्या हक्कासाठी वसई प्रांत कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत. मंदीमुळे गेल्या ३ वर्षापासून वीट उत्पादक डबघाईला आले असतांनाही शासनाने हा व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी काही सवलती देण्याऐवजी मातीवरील कर पाच पटीने वाढविल्याने हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. तसेच झाल्यास हजारो मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे शासनाने नियमाप्रमाणे रॉयल्टी घ्यावी यासाठी विट उत्पादक, मजूर यांनी एकत्र येऊन या मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात विटभट्टी मजूरांना कामाच्या परिसरात रेशनचे धान्य द्यावे, ६० वर्षाच्या मजुरांना पेन्शन द्यावे व व्यवसाय परवान्याच्या जाचक अटी रद्द कराव्यात या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये कॉ. राजेंद्र परांजपे, पुरूषोत्तम कुंभार, हरिभाऊ वरठा, बळीराम चौधरी, विष्णू पाडवी इ. कम्युनिस्ट नेते या मोर्चात सामील होणार आहेत. (वार्ताहर)
वसई प्रांत कार्यालयावर मार्क्सवाद्यांचा धडक मोर्चा
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST