- शशी करपे, वसई केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानात केंद्रीय पथकाने केलेल्या पाहणीत अस्वच्छता, प्रचंड दुर्गधी, घाणेरडे आणि सोयीसुविधांचा अभाव असलेले सरकारी कार्यालय असल्याचा ठपका वसई तहसिल कार्यालयावर ठेवण्यात आला आहे. पथकाने एकही गुण दिला नसल्याने स्वच्छतेत वसई तहसील कार्यालयाचा शेवटचा क्रमांक लागला. तर वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयाने स्वच्छता अभियानात सर्वाधिक गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला. केेंद्र सरकारच्या नगरविकास खात्यामार्फत देशभर स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. त्यानुसार देशातील सर्व महापालिका कार्यालये, सरकारी कार्यालयांची तपासणी करण्यात आली. दि क्वॉलिटी आॅस्ट्रीया सेंट्रल आशिया प्रा. लि. या संस्थेमार्फत वसई तालुक्यात १९ मार्च ते २१ मार्च दरम्यान चार केंद्रीय अधिकाऱ्यांच्या पथकाने वसई तालुक्यातील केंद्र, राज्य, निमसरकारी अशा एकूण २५ कार्यालयांची तपासणी करण्यात येऊन त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. तपासणी मोहिमेत शौचालये, मुतारी, वॉश बेसीन यांची उपलब्धता आणि कार्यशिलता यांची तपासणी करण्यात आली. तसेच कार्यालयातील आवश्यक त्या प्रमाणात कचरा पेट्यांची संख्या, दालने, दालना बाहेरील जागा व जीने यांची स्वच्छता तपासण्यात आली. त्यासाठी विविध निकषांवर २० गुण निर्धारित करण्यात आले होते. त्यात सर्वाधिक १८ गुण पटकावून वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयाने पहिला क्रमांक पटकावला. याआधी दि क्वॉलिटी काऊन्सिल आॅफ इंडिया या संस्थेने केलेल्या तपासणीत महापालिकेने देशातील ७५ शहरांमध्ये ३५ वा क्रमांक पटकावला होता. आता पहिला क्रमांक पटकावून सरकारी कार्यालयांमधील स्वच्छतेत सगळ्यांना मागे टाकले आहे. पालिका अधिक स्वच्छ, नियोजनबद्ध, गतीमान कारभार करील, लोकांना चांगल्या सुविधा पुरवेल असा विश्वास पालिकेचे सह आयुक्त सुखदेव दरवेशी यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, केेंद्रीय पथकाच्या पाहणीत वसईचे तहसील कार्यालया सर्वाधिक घाणेरय्ऋे, अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आणि सोयी सुुविधांचा अभाव असलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या कार्यालयाला पथकाने एकही गुण दिला नाही. तहसिल कार्यालय दररोज हजारो लोकांची ये-जा असते. पण, कार्यालयाच्या आवारात स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही. कार्यालयाच्या तळमजल्यावर कँटीन शेजारी अतिशय घाणेरड्या अवस्थेत असलेले स्वच्छतागृह गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. कर्मचाऱ्यांसाठी पहिल्या मजल्यावर असलेले स्वच्छतागृहही अतिशय अस्वच्छ आणि घाणेरडे आहे. कार्यालयात दाखले, सरकारी कागदपत्रे, जमिनीचे दावे, रेशनिंग, निवडणुकीची कामे अशा विविध कामांसाठी दररोज शेकडो लोक येत असतात. पण, त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह नाही. पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. तर नैसर्गिक विधीसाठी सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो. सध्या तहसिल कचेरीने महसूलपोटी लोकांकडून ८२ कोटी गोळा केले आहेत. पण, लोकांना प्राथमिक सुविधा पुरवण्यात तहसिल कचेरी अपयशी ठरत असल्याचे केंद्रीय पथकाने चव्हाट्यावर आणले आहे. महत्वाचे म्हणजे वसईतील अनेक तहसिलदार अँटीकरप्शनच्या जाळ्यात अडकले होते. यातील एक जण सध्या तुरुंगात असून कोट्यवधी रुपयांची माया गोळा करून गायब झालेला नितीश ठाकूर यानेही वसईत तहसिलदार म्हणून काम केले होते. भ्रष्टाचारात सतत प्रकाशझोतात असलेले तहसिल कार्यालय स्वच्छतेच्या बाबतीत मागास राहिले आहे. प्रांताधिकारी कार्यालयाने १६ गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे.
तहसील कचेरी अस्वच्छतेत पहिली
By admin | Updated: March 28, 2016 02:25 IST