- शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : स्त्रीच्या वेशात असलेल्या बहुरुपींना चोर समजून नाळे गावात विवस्त्र करून चोपण्यात आले. ते चोर नसून बहुरुपी असल्याचे पोलीस ठाण्यात निदर्शनास आल्यानंतर कोणतीही तक्रार न करता त्यांना सोडून देण्यात आले.गाव गावात गेल्या महिन्यात चोरट्यांनी तीन दिवस धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या परिसरातील भीतीचे वातावरण आहे. त्यातच नालासोपारा पश्चिमेकडील नाळे गावात पाच बहुरुपी स्त्रीचा वेष धारण करून देवीच्या नावाने दान मागत फिरत होते. ते चोरच असल्याचे समजून काही गावकऱ्यांनी त्यांना पकडून एका वाडीत नेले. त्या ठिकाणी त्यांच्या अंगावरील कपडे काढण्यात आल्यानंतर ते पुरुष असल्याचे आढळून आले. त्यामुळे गावकऱ्यांचा संशय बळावला. हे पाचजण स्त्रीच्या वेशात फिरून घरे शोधून ठेवून रात्री चोऱ्या करीत असावेत, असा संशय त्यांना आल्याने पाच जणांना गावकऱ्यांनी भरपूर चोप दिला व त्यांना नालासोपारा पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, चौकशीअंती ते पाचही जण बहुरुपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनीही कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून दिले. या घटनेनंतर मात्र सोशल मिडीयातून वसई विरार परिसरात तृतीयपंथीयाच्या वेशात चोरट्यांची टोळी फिरत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
स्त्रीच्या वेशातील पाच बहुरुपींना चोप
By admin | Updated: June 14, 2017 02:49 IST