पिंपळखुटा : दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना अवैध दारू विक्रीबाबत पोलीस प्रशासन व अबकारी निर्णायक भूमिका घेत नाही़ यामुळे तालुक्यात अनेक गावांतील महिलांनीच दारूबंदीबाबत पुढाकार घेतला आहे़ येथील महिला मंडळाने सुमन उथडे यांच्या पुढाकारात गावात दारू पिणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्यांविरूद्ध लढा उभारला आहे़ गाव व परिसरातील महिला मंडळेही जागृत झाल्याचे दिसते़गत अनेक वर्षांपासून सूमन उथडे या दारूबंदीविषयी गावात जनजागृती करून दारू काढणाऱ्याला समज देण्याचे काम करीत होत्या; पण याचा महिला मंडळांना वाईट अनुभव आला. दारू भट्टीवर धाड टाकून आरोपीस पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे मोठे काम महिला मंडळांनी केले होते़ तेव्हा गावठी दारूभट्ट्या बंद झाल्या; पण काहींनी गावात देशी दारू आणून विक्री सुरू केल्याने दारूबंदीचे कार्य पूर्ण होत नव्हते़ या सर्व गोष्टी ताज्या असतानाच पोलिसांनी मात्र अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली नाही, असा आरोप महिला मंडळांनी केला आहे. तालुक्यात दारूबंदीसाठी महिला पुढाकार घेऊन झटत असताना पोलिसांचे सहकार्य अपेक्षीत होते; पण तसे होत नाही़ आजपर्यंत पोलिसांशिवाय महिला मंडळानी दारू काढण्यास मज्जाव केला; पण पाहिजे त्या प्रमाणात गावातून सहकार्य मिळत नाही. पिंपळखुटा येथील पोलीस पाटलांचे पद रिक्त असल्याने गावात शासनाचा प्रतिनिधी नाही. यामुळे महिलांनाच पोलीस ठाण्यात जावे लागते़ तेथेही सहकार्य मिळत नाही, असे महिला सांगतात़ येथे सक्षम महिला दारूबंदी मंडळ असल्याने गावात दारूचे प्रमाण कमी असले तरी दारू पिणारे आंबट शौकीन परिसरात जेथे दारू मिळेल, तेथे जाऊन शौक पूर्ण करतात. यावरून परिसरात गावठी दारूविक्रीत वाढ होत असल्याचे सिद्ध होते़ यामुळे येथील महिला दारूबंदी मंडळाने गावोगावी जात महिलांना संघटीत करून दारूबंदीमुक्त परिसर करण्याचा प्रयत्न चालविला आहे़ महिला मंडळांचा हा पुढाकार पाहून सध्या दारूविक्रेतेही धास्तावल्याचे दिसते़(वार्ताहर)
दारूविक्री विरोधात महिला मंडळाचा एल्गार
By admin | Updated: August 19, 2014 23:53 IST