सेलू : गावात दंत मंजन विक्री करण्याकरिता आलेल्या तरुणीने संधी साधत घरातून मोबाइल लंपास केला. ही बाब घरमालकाच्या लक्षात येताच ग्रामस्थांच्या मदतीने सदर तरुणीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सदर घटना तालुक्यातील बाभुळगाव (कोंगा) येथे गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. अटक केलेल्या तरुणीचे नाव पुनम सोनी (२८) रा. हवालदारपूरा असे आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाभुळगाव येथील महेश नरेश नाखले यांच्या घरी सदर तरुणी मंजन विक्रेता असल्याचे सांगून आली होती. तीने नाखले यांना दंत मंजनची बाटली दिली. पैसे आणण्यासाठी नाखले घरात गेले असता, तरुणीने हिच संधी साधून खिडकीत ठेवलेला मोबाइल पळविला. दरम्यान, नाखले पैसे घेवून परत आले असता त्यांना तरुणी तीथे दिसली नाही. तसेच खिडकीतील मोबाइल ही जागेवर नव्हता. त्यांनी सदर तरुणीवर संशय घेत तिचा पाठलाग केला. तिला ग्रामस्थांनी ताब्यात घेवून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी तिची झडती घेतली असता तिच्याकडे चोरीतील मोबाईल आढळला. या प्रकरणी सेलू पोलिसांनी भांदविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सेलू पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
दंत मंजन विकण्याच्या बहाण्याने तरुणीने मोबाईल पळविला
By admin | Updated: August 22, 2014 00:03 IST