आरोग्य मंत्र्यांची ग्वाही : संपूर्ण जिल्ह्यात डॉक्टर, कर्मचाऱ्यांची १५२ पदे रिक्तवर्धा : शासकीय रुग्णसेवा दर्जेदार करण्यासाठी अनेकविध योजना राबविल्या जातात; पण मुख्य समस्येकडे दुर्लक्ष केले जाते. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे रुग्णसेवेत अडथळे येत आहेत. सामान्य रुग्णालयात शल्य चिकित्सकासह वर्ग एक ते चारपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांची तब्बल १५२ पदे रिक्त आहेत. याबाबत आमदार रणजीत कांबळे यांनी विधानसभेत प्रश्नकाळात प्रश्न उपस्थित केला. यावर शुक्रवारी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी दीड महिन्यांच्या आत रिक्त पदे भरली जातील. शिवाय आठ दिवसांत जिल्हा शल्य चिकित्सकाची नियुक्ती केली जाईल, अशी ग्वाही दिली. शासकीय रुग्णालये, आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे योग्य रुग्णसेवा मिळत नाही. परिणामी, रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये धाव घ्यावी लागते. सामान्य रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व विभागांत डॉक्टर असणे गरजेचे आहे; पण डॉक्टरांचाच अभाव आहे. सामान्य रुग्णालयात ग्रामीण तथा शहरातील रुग्ण येतात. डॉक्टर नसल्याने योग्य उपचार मिळत नाही. काही रुग्ण खासगी रुग्णालयात जातात; पण गरीब रुग्णांना नाईलाज म्हणून शासकीय रुग्णसेवेचा लाभ घ्यावा लागतो. यामुळे आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी सामान्यांतून होत आहे. ही बाब गंभीरतेने घेत आ. कांबळे यांनी प्रश्न लावून धरला. रिक्त पदांमुळे रुग्ण सेवा प्रभावित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रश्नाचे उत्तर देताना आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी दीड महिन्यांत संपूर्ण आरोग्य व्यवस्था पूर्णत: सुदृढ दिसेल, तसेच आठ दिवसांत शल्य चिकित्सकाचे पद भरले जाईल, अशी ग्वाही दिली.(कार्यालय प्रतिनिधी)शल्य चिकित्सक प्रभारीसामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांत शल्य चिकित्सकासह वर्ग एकची १६, वर्ग दोनची २०, वर्ग तीनची ५४ पदे व वर्ग चारची ५५ पदे रिक्त आहे. देवळी रुग्णालयासह जिल्ह्यात १५२ पदे रिक्त आहेत. सामान्य रुग्णालयात शल्य चिकित्सक पद रिक्त असून निवासी शल्य चिकित्सकांकडे प्रभार आहे. वर्ग एकची १३, वर्ग दोनची ३२, वर्ग चारची ३० पदे रिक्त आहे. हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात वर्ग दोनचे एक, वर्ग ३ चे ३, वर्ग ४ ची ५ व प्रशासकीय अधिकारी पद, आर्वी उपजिल्हा रुग्णालयात वर्ग २ ची ३, वर्ग ३ ची ३, वर्ग ४ ची ४ पदे, सेलू ग्रामीण रुग्णालयात वर्ग ३ ची ३, वर्ग ४ चे १, वडनेरमध्ये वर्ग १ चे १, वर्ग ३ ची २, वर्ग ४ ची ३, वर्ग ४ चे १ तर समुद्रपूरमध्ये वर्ग २ चे १, वर्ग ३ चे ३ तर वर्ग ४ चे १ पद रिक्त आहे.
दीड महिन्यांत भरणार आरोग्य विभागातील रिक्त पदे
By admin | Updated: August 3, 2015 01:59 IST