खंत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची वर्धा : सफाई कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही पालिका स्तरावर घेतली जात नाही. त्यांचे वेतन चार-चार महिने मिळत नाही. यामुळे ही मंडळी समाजाच्या मुख्यप्रवाहात आलेली नाही. या मंडळींमध्ये जनजागृतीचा अभाव असल्यामुळे हलाखीचे जीवन जगत आहे, अशी खंत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्य डॉ. लता महतो यांनी व्यक्त केली.सफाई कर्मचाऱ्यांच्या योजनांची अंमलबजावणी होते वा नाही, हे जाणून घेण्यासाठी डॉ. महतो शनिवारी वर्धेत आल्या होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालिका स्तरावर सफाई कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोई-सवलती व योजांचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. एकाही पालिका क्षेत्रात सफाई कर्मचाऱ्यांच्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याचेही महतो म्हणाल्या. नव्या आकृतीबंधानुसार एक हजार नागरिकांमागे एक सफाई कर्मचारी आवश्यक आहे. ही बाब विचारात घेवून पालिकांना प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिल्याची माहिती महतो यांनी दिली.(जिल्हा प्रतिनिधी)
सफाई कर्मचारी शासनाच्या योजनांपासून अनभिज्ञ
By admin | Updated: June 22, 2014 00:05 IST