वर्धा : जिल्ह्यातील तीन ठाणेदारांच्या बदल्या झाल्या. यामध्ये वादग्रस्त ठरलेले खरांगणाचे ठाणेदार करीम मिर्झांसह आर्वीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे व अल्लीपूरचे सुभाष काळे यांचा समावेश आहे.पोलीस महासंचालकांच्या स्वाक्षरीने हे बदल्याचे आदेश मंगळवारी जिल्ह्यात धडकले. आगामी विधानसभा निवडणुपूर्वी मागील चार वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच जिल्ह्यात कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले होते. सदर आदेशानुसार या बदल्या करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आर्वीचे ठाणेदार चकाटे हे मागील चार वर्षांपेक्षा अधिक जिल्ह्यात कर्तव्यावर होते. त्याची बदली पोलीस प्रशिक्षण विद्यालय नागपूर येथे करण्यात आली आहे. खरांगणाचे ठाणेदार करीम मिर्झा यांची बदली नागपूर शहर येथे करण्यात आली आहे, तर अल्लीपूरचे ठाणेदार सुभाष काळे यांची बदली नागपूर ग्रामीण येथे करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक कालावधी ठाणेदार करीम मिर्झा यांनी जिल्ह्यात घालवला आहे. त्यांच्या काळात सेवाग्राम ठाण्यात एका महिलेच्या कथित आत्महत्येचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोपही झाले. यामुळे त्यांचे पोलीस मुख्यालयात स्थानांतर करण्यात आले होते. या शिवाय इतर कारणानेही ते वादग्रस्त ठरले होते. पोलीस अधीक्षक म्हणून अनिल पारस्कर यांनी पदभार सांभाळल्यानंतर अल्पावधीतच मिर्झा यांना खरांगणा ठाणे देण्यात आले. आता त्यांची येथूनही जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
वादग्रस्त मिर्झांसह तीन ठाणेदारांच्या बदल्या
By admin | Updated: August 5, 2014 23:49 IST