आष्टी (श.) : उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे भूमिपूजन १८ डिसेंबर १९७६ मध्ये झाले. यानंतर तब्बल १७ वर्षांनी जून १९९३ रोजी बांधकाम पूर्ण झाले. डाव्या कालव्याचे बांधकाम ४ आॅक्टोबर १९९५ मध्ये पूर्ण झाले. या कालव्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून पाटचऱ्यांचे बांधकामही झाले नाही. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. डागडूजी व दुरूस्तीसाठी निधी मिळत नसल्याने अधिकाऱ्यांना सर्व समस्यांना तोंड देत रोष सहन करावा लागत आहे.सध्या रबी हंगाम सुरू असून धरण विभागाने सिंचनासाठी कालव्यातून पाणी सोडले. यातून पाटचऱ्यांद्वारे शेतात पाणी पोहोचले; पण मातीच्या पाटचऱ्या जागोजागी फुटल्याने शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही. ओरड केल्यावर उलट उत्तरे दिली जातात. मौजा चेकबंदीमध्ये शेतकरी ज्ञानेश्वर लालजी मेंढे यांच्या अर्ध्या शेतातून पाणी पाझरत असल्याने पीक वाया जात आहे. दीड एकर शेती त्यांनी पाण्यामुळे पडिक ठेवली आहे. ओलितासाठी पाणी मिळत नाही; पण रस्त्यालगत पाण्याचे लोट वाहतात. आष्टी ते किन्हाळा रस्त्याचे भविष्य पाण्यामुळे बिकट आहे. काळ्या मातीचा भाग असल्याने रस्त्याच्या मधोमध कधी भगदाड पडेल, याचा भरवसा नाही. अधिकाऱ्यांना सांगितल्यावर कर्मचारी पाठवितात. हे कर्मचारी काम सोडून श्ेतकऱ्यांनाच सुनावतात. अप्पर वर्धा धरणाची साठवण क्षमता ६७८.२७ दलघमी आहे; पण त्या ताकदीने सिंचन होत नाही. तालुक्यात अनेक पाटचऱ्या अपूर्ण आहे. सद्यस्थितीत २५० हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे.तालुक्यातील पाटचऱ्यांचे अद्यापही काँक्रीटीकरण झाले नाही. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. शेती पडिक राहत आहे. धरणे विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.- ज्ञानेश्वर मेंढे, शेतकरी, लहानआर्वी.आष्टी तालुक्यातील कालवे व पाटचऱ्या बांधकामासाठी सर्व प्रस्ताव शासनाला पाठविले आहे. पाठपुरावा सुरू आहे. अनेक पाटचऱ्यांचे बांधकाम मार्गी लागले आहे.- दादाराव केचे, माजी आमदार, आर्वी.
पाटचऱ्या बांधकामाअभावी हजारो लिटर पाण्याचा होतोय अपव्यय
By admin | Updated: January 25, 2016 03:28 IST