वायगाव(नि.) : येथील बसस्थानक चौक म्हणजे गावाचा आत्मा़ पसिरातील गावांसाठी ही मोठी बाजारपेठ आहे़ यामुळे अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांची येथे दुकाने आहेत. त्या सर्वांना बबन मुरलीधर कोराटे (६५) हे गत १५ वर्षांपासून अव्याहत पाणी पुरवित आहेत़ यातून त्यांचा दुष्काळी संसार बहरला आहे़ परिणामी, बेरोजगारीत खितपत पडलेल्यांकरिता ते आदर्शवतच ठरत आहेत़आजच्या घडीला नोकरी नाही म्हणून अनेकजण शासनाच्या नावाने बोटे मोडताना दिसतात; पण शाळेची पायरीही ओलांडली नसलेले बबन कोराटे हे यास अपवाद ठरत आहेत़ त्यांच्या घरी अठराविश्वे दारिद्र्य होते. दिवस उजाडला की, भाकरीची काळजी पडत होती; पण त्यांनी १५ वर्षांपासून वायगाव (नि.) चौकात पाणी पुरवठ्याचे काम सुरू केले आहे़ प्रारंभी ते ५० पैसे गुंड आकारत होते; पण आज ४ रुपये गुंडाप्रमाणे दुकानदारांना ते पाणी पुरवित आहेत़ सध्या उन्हाचा पारा चढत असल्याने सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ यात बबन कोराटे हे प्रत्येक दुकानात कुलरचे टप भरण्याचे २० रुपये तर पिण्याच्या पाण्याचा ड्रम भरण्याचे ८० रुपये आकारून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतात़ गुंडाने पाणी आणण्याकरिताही त्यांना भटकंती करावी लागते़ असे असले तरी त्यावर कुटुंबाचा गाढा हाकला जात असल्याने कुठलीही तक्रार न करता ते पाणी पुरवितात़(वार्ताहर)गरजू व गरिबांच्या घरी भरतात विनामूल्य पाणीगावातील नागरिकांना पाण्याची गरज वाटल्यास बबन कोराटे यांना सांगितले जाते़ त्यांना सांगताच ते हजर होतात़ पाण्याचे पैसे घेताना ते कुणाशीही वाद करीत नाही. कुणी दिले तेवढे ते घेतात़ शिवाय गावातील गरीब व गरजू नागरिकांकडे लग्नप्रसंग असल्यास ते विनामूल्य पाणी भरून देतात़ आजपर्यंत अनेक लग्न समारंभांमध्ये त्यांनी ही विनामूल्य सेवा प्रदान केली आहे़ यातून मिळणारे आशीर्वाद, हिच आपल्या आयुष्याची कमाई असल्याचे ते सांगण्यास विसरत नाहीत़प्रत्येक दुकानामध्ये पाणी भरत असताना त्यांना कधीकाळी हीन वागणूकही मिळते; पण ते वाद घालत बसत नाहीत़ श्रम करीत असून त्याचाच मोबदला घेत असल्याचेही ते सांगतात़पाणी भरून देण्याच्या या नित्यक्रमामुळेच १५ वर्षांपासून त्यांचा संसार बहरला आहे़दोन-चार रुपयांमध्ये हल्ली काहीच होत नाही; पण मेहनतीने गुंडभर पाणी आणून ते केवळ चार रुपये घेत असल्याने सर्वच त्यांना हक्काने पाणी सांगताना दिसतात़
पाणी विकून चालतो त्यांचा दुष्काळी संसार
By admin | Updated: April 9, 2015 02:55 IST