नंदोरी : सध्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि शेतीचे चित्रच पालटल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस तोट्यात जात असलेली पारंपरिक शेती शेतकर्यांना आर्थिक गर्तेत लोटत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागात श्रीमंत व्यक्ती शेतकरी झाल्याचे दिसतात तर पिढीजात शेतकरी आपल्या शेतजमिनी मक्त्याने देत दुसर्याच्या शेतावर शेतमजुरी करीत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील हे विदारक वास्तव आहे. प्रत्येक हंगामात जीवाचे रान करून कुटुंकबाचा उदरनिर्वाह करणे आता शेतकर्यांना पवडण्यासारखे राहिले नाही. शेती व्यवसाय म्हणजे डोक्यावर कर्जाचे ओझे वाढविण्याची एक परंपराच झाली आहे. असे असताना गरीब शेतकरी न परवडणार्या व्यवसायापासून दुरावत आहे. ज्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात पैसा आहे, असे धनिक, व्यापारी, शासकीय कर्मचारी, अधिकारी व राजकीय पुढारी शेती खरेदी करून शेतकरी बनण्याच्या नादात आहे. हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. सध्या तर ग्रामीण भागातील लघू शेतकर्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत शिल्लक राहिली आहे. शेतकर्यांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे. वडिलोपाजिर्त असलेल्या जमिनीवर नोकरी नाही म्हणून शेती व्यवसाय करावा लागतो. शेती म्हणजे डोक्यावर कर्जाचा डोंगर, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी मे महिन्यापासून शेती व्यवसायात कुटुंबासह स्वत:ला झोकून देतो. जवळपास चार महिने जीवाचे रान करतो; पण शेतीस लागणारा खर्च व शेतीतून मिळणारे उत्पन्न या दोन्हीमध्ये तफावत असते. यामुळे शेतकरी या व्यवसायातून कुटुबांचा उदरनिर्वाह करू शकत नाही. या स्थितीमुळे शेतकर्याला कर्जाच्या ओझ्याखाली खितपत जगावे लागते. शेतकर्यांनी सध्या शेती सोडून अन्य कामाकडे वळण्याचा नवीन पर्याय शोधल्याचेच शेतीच्या व्यवहारांवरून दिसून येते.(वार्ताहर)
पिढीजात शेतकर्यांवर आली मजुरीची वेळ
By admin | Updated: May 15, 2014 23:51 IST