जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : तक्रारकर्त्याला मिळणार माहितीवर्धा : जनतेने प्रशासनासंदर्भात असलेल्या तक्रारी अथवा गाऱ्हाणी प्रथम तालुकास्तरावरील लोकशाही दिनामध्ये दाखल करावी. त्यानंतर तिथेही समाधान न झाल्यास जिल्हा लोकशाही दिनामध्ये तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी नागरिकांना केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातून आलेल्या विविध तक्रारींची दखल घेऊन त्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच तक्रारदाराला आपल्या तक्रारी संदर्भामध्ये केलेल्या कार्यवाहीची माहिती दिल्यास त्यांचे समाधान होईल. या दृष्टीने सर्व विभागप्रमुखांनी दखल घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रमाणे जिल्हा लोकशाही दिनामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या. प्रत्येक तक्रारीची चौकशी करुन संबंधित विभाग प्रमुखांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागितला आहे. यावेळी लोकशाही दिनामध्ये २८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. लोकशाही दिनी सर्व विभागप्रमुखाने उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले. श्रम व पैसा खर्च करुन सामान्य जनता आपल्या तक्रारी जिल्हा प्रशासनासमोर मांडण्यासाठी येतात. त्यांच्या तक्रारीसंदर्भात समाधान करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सांगितले. जिल्हा लोकशाही दिनी यापूर्वी सादर झालेल्या परंतु अद्यापर्यंत निपटारा न झालेल्या तक्रारीचा सर्व विभागाने आढावा घ्यावा. या सर्व तक्रारी एक महिन्याच्या आत निकाली काढाव्या, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्यात. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, अपर जिल्हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)२८ तक्रारी दाखललोकशाही दिनाच्या माध्यमातून प्रलंबीत तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आले.नागरिक श्रम व पैसा खर्च करून येथे तक्रारी घेऊन येतात. त्यांचे समाधान होणे गरजेचे आहे. याशिवाय प्रलंबीत तक्रारींचा आढावा घेऊन त्या तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
लोकशाही दिनातील प्रत्येक तक्रारीची दखल घ्या
By admin | Updated: August 5, 2015 02:08 IST