सालेकसा : येत्या काही दिवसांत येथील नवनिर्मित नगर पंचायतच्या प्रथमच निवडणुका होणार असून येथे अनुसूचित जमातीचा बोलबाला राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहेत. एकूण १७ जागांपैकी आठ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत करण्यात आल्याने निवडून येणाऱ्यांचा नगर पंचायतमध्ये ४७ टक्के वाटा राहणार आहे. यात चार पुरूष आणि चार महिला समावेश राहणार आहे. यात आश्चर्य असे की अनुसूचित जाती (एस.सी.) साठी फक्त एकच जागा असून ती ही महिलासाठी राखीव आहे. त्यामुळे येथे अनुसूचित जमातीच्या पुरूष वर्गातील इच्छुक नेत्यांसाठी नगर पंचायतमध्ये नो एन्ट्री दिसत आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचा भ्रम निराश झालेला आहे. सालेकसा नगर पंचायतीमध्ये खऱ्या अर्थाने सालेकसा शहराचा समावेश झाला नाही. कारण की सालेकसा शहराचा भाग हा आमगाव खुर्द ग्रामपंचायतमध्ये आहे. त्यामुळे सालेकसा शहरातील लोक आधीच लाचार होऊन बसले आहेत. तर आता नगर पंचायत ही शहराबाहेर असून यात विश्रामगृह परिसरालगत सालेकसाचा काही भाग, मुरूमटोला, हलबीटोला, जांभळी, बाकलसर्रा इत्यादी गावाचा समावेश आहे. यात जांभळी बाकलसर्रा तर मुख्यालयापासून फारच दूरवर जंगलात वसलेली गावे आहेत. परंतु त्यांचा समावेश आधीपासूनच सालेकसा ग्राम पंचायतमध्ये असल्याने ती गावे आता नगर पंचायत क्षेत्रात आली आहेत. नव्याने अस्तित्वात आलेल्या नगर पंचायतमध्येही अनेक गैर आदीवासी दिग्गज नेते आहेत. आरक्षण निघण्यापूर्वी त्यांना असे वाटत होते की आता नगर पंचायतीवर आपले राज येईल. परंतु आरक्षण जाहिर झाल्यानंतर त्यांची स्वप्ने भंगली आहेत. ३७०० च्या जवळपास लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतला एकूण १७ प्रभागामध्ये विभाजीत करण्यात आले आहे. यात महिलांसाठी एकूण नऊ प्रभाग राखीव आहेत. यात अनु. जमाती चार, अनु.जाती एक, नामाप्रचे तीन आणि सर्वसाधारण एक महिला सदस्य राहणार आहे. प्रभाग क्रं. १,२,६,७,९,१३,१५ आणि १६ या एकूण आठ प्रभागांत अनु. जमाती (एस.टी.) सदस्य निवडून जातील यापैकी २,६,९ आणि १५ या प्रभागातून महिला सदस्य राहतील. अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रं. ८ राखीव असून येथे महिला सदस्य राहील. प्रभाग क्रं. ३,४,५,११ आणि १२ हे पाच प्रभाग नामाप्रसाठी राखीव असून यापैकी ३, ५ आणि ११ क्रमांकाच्या प्रभागात महिला सदस्य राहतील. सर्वसाधारणासाठी प्रभाग क्रं. १०, १४ आणि १७ हे तीन प्रभाग खुले राहतील. यात प्रभाग क्रं. १४ महिलासाठी राहील. सालेकसा नगर पंचायतमध्ये गैर आदिवासी किंवा खुला प्रवर्गातील इच्छुकांना फार कमी संधी मिळेल परंतु नवीन आदिवासी चेहरे राजकारणात उद्यास येतील एवढे नक्की. (प्रतिनिधी)
नगर पंचायतवर येणार ‘एसटी’राज
By admin | Updated: August 28, 2015 01:46 IST