विरूळ (आ़) : दरवर्षीच शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होताना दिसतात़ या बदलाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे दिसते़ यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे़सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळाने अक्षरश: वेड लावले आहे़ विविध वाहिन्यांवर चालणाऱ्या कार्टुन, गेम व अन्य खेळांत विद्यार्थी सुटीच्या दिवशी मग्न असतात़ पाठीवर दप्तराचा भार, शिकवणी वर्गाला हजेरी आदींचा विद्यार्थ्यांच्या मनावर भार वाढत असताना शैक्षणिक दृष्ट्या केवळ अभ्यासू होत आहेत़ यात शालेय अभ्यासक्रमातून क्रीडा शिक्षण हद्दपार झाल्याने त्याचा शारीरिक विकास होत नसल्याचे दिसून येते़ अनेक शाळांत यापूर्वी पीटीच्या वर्गात खेळण्याचे धडे दिले जात होते; पण आता शारीरिक शिक्षण हा विषय बंद झाला़ शिवाय विद्यार्थ्यांना पुरेसे मैदानही उपलब्ध नसल्याने शिक्षकही शारीरिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते़ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांना खेळण्यासाठी गावात मैदान असावे, या प्रामाणिक हेतूने पायकांतर्गत क्रीडांगण तयार करण्यासाठी प्रत्येक पंचायत समित्यांना निधी देण्यात आला़ पंचायत समितीमार्फतही काही निवडक गावांना क्रीडांगण तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला़ आर्वी तालुक्यातही पंचायत समिती स्तरावर १४ गावांना क्रींडागणासाठी निधी देण्यात आला होता़ यात १२ गावांची क्रींडागणे तयार करण्यात आलीत; पण यात संबंधित ग्रामसेवक, कंत्राटदार व पंचायत समितीच्या अभियंत्याने गैरप्रकार केल्याचे दिसते़ क्रींडागणाचे काम निकृष्ट झाल्याने ते अखेरच्या घटका मोजत आहे़ या क्रींडागणावर सध्या विद्यार्थी खेळताना तर नाही; पण गावातील जनावरे चरताना दिसतात़ क्रीडांगणावर काटेरी झुडपे, गवत वाढले आहे़ यामुळे नेमके क्रीडांगण कुठे आहे, हे दिसून येत नाही़ क्रीडांगणावर केवळ नावापुरता फलक लागला आहे़ क्रीडांगण तयार करण्याची जबाबदारी पं़स़ शाखा अभियंता व ग्रामसेवकाकडे होती़ सध्या ग्रामीण भागातील क्रीडांगणेही लुप्त झाली आहेत आणि शाळांमध्येही शारीरिक शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे़ यामुळे बालकांचे आरोग्य राखण्यासाठी पालकांनाच विशेष प्रयत्न करावे लागत असल्याचे दिसून येत आहे़(वार्ताहर)
क्रीडा शिक्षणाकडे शाळांमध्ये कानाडोळा
By admin | Updated: November 26, 2014 23:10 IST