वर्धा : निसर्गाच्या लहरीपणातून वाचलेल्या पिकांवर विविध अळ्या, रोग येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस येतो. सध्या सोयाबीनसह संत्रावर्गीय पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विज्ञान केंद्राच्या पाहणीत समोर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. सेलसुरा, पडेगाव, सोनेगाव, लोणसावळी, वाटखेडा, बोपापूर सालोड, देवळी, आर्वी, कारंजा, आष्टी, हिंगणघाट, समुद्रपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतावर सद्यस्थितीत सोयाबीन पिकावर उंटअळी व केसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शिवाय अत्यल्प प्रमाणात चक्रीभुंगा, तंबाखूची पाने खाणारी अळी आढळून येत आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनवरील किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखून पिकावर फवारणी करणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्र सेलसुराच्या पीक संरक्षण विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत. सोयाबीन पिकावर सध्या ३०० च्या वर किड आढळून येतात. यातील १५ ते १८ किडीच आपल्या भागात नुकसान करताना आढळतात. यात तंबाखूची पाने खाणारी अळी, खोडमाशी, चक्रीभुंगा, पाने गुंडाळणारी अळी, उंटअळी, केसाळ अळी या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. या किडीच्या नियंत्रणासाठी आर्थिक नुकसानीची पातळी असताना फवारणी केल्यास लाभ होतो. यामुळे शेतकऱ्यांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)कृषी विज्ञान केंद्राने सुचविल्या उपाययोजनानत्रयुक्त खताचा समतोल वापर करावा. पिकात हेक्टरी २० ते २५ पक्षीथांबे उभारावे. तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीसाठी हेक्टरी १० ते १२ कामगंध सापळे लावावेत तसेच सापळ्यात जमा झालेले पतंग रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून नष्ट करावे. चक्रीभुंगा व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. अशी किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. पाने खाणाऱ्या अळ्या चक्रीभुंगा व खोडमाशी या किडींनी अंडी घालू नये, यासाठी सुरूवातीलाच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. केसाळ अळी, तंबाखूची पाने खाणारी अळी, एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात व त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरूवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात. अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडीसह नष्ट करावीत. तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एसएलएनपीव्ही ५०० एलई विषाणू २ मिली प्रती लिटर पाणी वा नोमूरीया रिलाई या बुरशीची ४ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी आढळून येताच करावी.किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच शेवटचा पर्याय म्हणून शिफारशीनुसार किटकनाशकाची फवारणी करावी. सद्यस्थितीत सोयाबीन पिकातील पानाच्या शिरा पिवळ्या पडलेल्या काही शेतकऱ्यांच्या शेतावर आढळून आले आहे. या उपाय म्हणून २०० ग्रॅम युरिया तसेच ५ टक्के निंबोळी अर्क वा ३०० पीपीएम निंबोळी अर्क ५० मिली पिकावर फवारणे शक्य आहे. असे केल्यास सोयाबीन पिकावरील पाने हिरवी होण्यास मदत होईल, अशा उपाययोजना कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. प्रदीप दवनेयांनी सुचविल्या आहेत.
सोयाबीनसह संत्र्यावर अळ्यांचा हल्ला
By admin | Updated: July 29, 2015 02:06 IST