पुलगाव : एप्रिलच्या प्रारंभीच सूर्याची वक्रदृष्टी असून पारा ४३ च्या वर गेला आहे़ जीवाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळा वैशाख वणव्याची प्रखरता दाखवित आहे़ या प्रखरतेत सावलीचा सुखद गारवा देणारा लाल-केशरी फुलांचा व डेरेदार अस्तित्वाचा गुलमोहर फुलला आहे़ तो रस्त्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना खुणावत असल्याचे दिसते़ ऋतू परिवर्तनाची चाहूल फक्त मनुष्यालाच नव्हे तर पशु-पक्षी व वनस्पतींनाही लागते़ परसबाग वा टेरेसवर ग्रीननेटच्या सावलीत एप्रिल महिन्यात लांब दांड्यांची पंचफुलाची केशरी बदामी एप्रिल फ्लॉवर्सची फुले बहरली आहे़ मे फ्लॉवर्सही हिरव्याकंच लांब पानांनी व पुष्पगुच्छाच्या आकारासम फुलांच्या बोलराणी कात टाकू लागला आहे. रस्त्यांच्या बाजूला, उद्यानात गुलमोहर डोकावत आहे़ या झाडांच्या मूळे, पाने, फुले व साल सर्वच बाबींचा औषधी वनस्पती म्हणून उपयोग होतो़ डायकॉटीलिजन म्हणजे द्विदल वर्गात मोडणारा गुलमोहर वनस्पतीशास्त्रात ‘सीजलपिनीया पुलचेरिमा’ नावाने ओळखला जातो़ या झाडाची साल, मूळ, पाने, फांद्या कावीळ, ताप किडनी व पोटाच्या आजारासाठी औषध म्हणून वापरता येते, असे वनस्पतिशास्त्राचे प्रा. गौरव दुधबावरे सांगतात़ कीटकनाशक तसेच डायरिया, गॅस्टो आजारात रामबाण उपाय म्हणूनही वापरता येते.(तालुका प्रतिनिधी)
वनस्पतींना लागतेय ऋतू परिवर्तनाची चाहुल
By admin | Updated: May 4, 2015 02:05 IST