एसआरपीएफच्या ३० जवानांची तुकडी दीड महिन्यापासून जंगलातचअमोल सोटे आष्टी (शहीद)गत दोन महिन्यांपासून अस्वलाने आष्टी तालुक्यात कहर माजविला आहे. तब्बल पाच शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले केले आहे. हे अस्वल जंगलात दडून बसल्याने वनविभागाच्यावतीने त्याचा शोध घेण्यात आला. यात त्यांना अपयश आले. या अपयशामुळे एसआरपीएफच्या ३० जवानांच्या एका तुकडीला अस्वल शोधण्याची जबाबदारी देण्यात आली. ही तुकडी दीड महिन्यापासून जंगलात अस्वलाचा शोध घेत आहे. तेही या कामात अपयशी ठरल्याने आता तीन दिवसांपूर्वी या अस्वलाच्या शोधात स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स दाखल झाली आहे. या फोर्सने जंगलाला दोन्ही बाजूने घेरले असून अस्वल शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. आष्टी वनक्षेत्रांतर्गत माणिकवाडा येथील दोन व मोई येथील दोन, अशा एकूण चार शेतकऱ्यांवर हल्ले चढविले. यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात या अस्वलाबाबत भीती निर्माण झाली. नागरिकांना भयमुक्त करण्याकरिता आष्टी वनपरिक्षेत्रामध्ये एसआरपीएफचे ३० जवान व वनविभागाच्या १५ कर्मचाऱ्यांनी अस्वलाच्या शोधाकरिता जीवाचे रान केले; मात्र या अस्वलाचा थांगपत्ता नाही. गत आठवड्यात तळेगाव वनपरिक्षेत्रातील पार्डी येथील शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला चढविला. हल्ला करणारे हेच अस्वल असल्याचा संशय बळावला. या अस्वलाचा बंदोबस्त करण्याकरिता मोई गावातील सुमारे अडीच हजार नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला चार तास वेठीस धरले होते. परिस्थिती चिघळत असल्याने प्रकरण थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पोहोचले. त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांना आदेश देऊन अस्वलाला पकडण्यासाठी सर्व यंत्रणा तात्काळ पाठविण्याचे आदेश दिले. यानंतर प्रकरणाला गती मिळाली. आष्टी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, तळेगाव (श्यामजी पंत) येथील वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. एस. टाले, वर्धेचे सहाय्यक उपवनसंरक्षक चव्हाण, फिरत्या पथकाचे सहायक उपवनसंरक्षक वसईकर, एसआरपीएफचे ३० जवान, १५ वनरक्षक, २५ वनमजूर यांच्या पथकाकडून या अस्वलाचा शोध सुरू आहे. या ७० कर्मचाऱ्यांच्या शोधपथकाला मदत करण्याकरिता गत तीन दिवसांपूर्वी नागपूर येथून स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स दाखल झाली आहे. डाबर मॅन जातीच्या श्वानासोबत हे सर्व पथक जंगलात दिवसरात्र फिरत आहे. अस्वलाची विष्ठा दिसल्यावर श्वान पुढील दिशा दाखवित असून त्याप्रमाणे शोध घेतला जात आहे. अस्वल एकच असून मोठ्या हुशारीने जंगलात इकडून तिकडे फिरत आहे. दोन्ही वनक्षेत्राच्या ६ किमी परिसरात सध्या हे पथक प्रत्येक ठिकाणी शोध घेत आहे; पण अस्वलाकडून मिळत असलेल्या हुलकावणीमुळे हे शोध पथकही कमालीचे वैतागले आहे. चंद्रपूर येथूनही पथक या अस्वलाच्या शोधाकरिता चंद्रपूर येथूनही पथक बोलविण्यात आले आहे. याखेरीज भुलतज्ज्ञ डॉक्टरांनाही पाठविण्यात आले आहे; मात्र अस्वल सापडेपर्यंत ही सर्व यंत्रणा काळजीत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अद्यापपर्यंत ४ शेतकऱ्यांना शासनाकडून कुठलीही मोठी मदत मिळाली नाही. वैद्यकीय अहवाल जोडून प्रस्ताव प्राप्त झाल्यावर तात्काळ मदत दिली जाईल, अशी माहिती वर्धाचे उपवनसंरक्षक डी.डब्ल्यू. पगार यांनी दिली.
स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सकडून ‘त्या’ अस्वलाचा शोध
By admin | Updated: October 19, 2016 00:56 IST