व्यवस्थापक अनभिज्ञ : पोलिसांनी दिल्या फलकातून कारवाईच्या सूचनांवर्धा : जिल्हा स्थळ असलेल्या वर्धेच्या बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करण्याकरिता लावण्यात आलेल्या बाकांवर स्कार्फधारकांनी त्यांचे बस्तान मांडले आहे. स्कार्फने चेहरा बांधून तासनतास युवती बसस्थानकावरव बसून असतात. यातून अनेक अवैध प्रकार घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याची दक्षता घेत वर्धा पोलिसांनी बसस्थानकावर पोस्टर लावून स्थानकावर स्कार्फ बांधून असलेल्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. वर्धा बसस्थानकावरून अनेक प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याचे वेळोवेळी समोर आले. रात्रीच्या वेळी बसस्थानकावर बसून दारू पिण्याच्या घटनाही पोलीस कारवाईत समोर आल्या आहेत. त्यावर कारवाईही करण्यात आली. शिवाय परिवहन महामंडळाच्या बसमधून दारूची वाहतूक होत असल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. या सर्व प्रकारामुळे सर्वसामन्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. यात आता बसस्थानकावर स्कार्फ धारकांचा त्रास प्रवाशांना होत होता. यामुळे बसस्थानकाच्या परिसरात सुरक्षा वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले. पूर्वी बसस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेकरिता एकच पोलीस कर्मचारी राहत होता. आता त्यात वाढ करण्यात आली असून त्यांची संख्या दोन करण्यात आली आहे.मध्यंतरी बसस्थानकाच्या आवारात स्कार्फ बांधलेल्या युवती तासन्तास बसून राहत असल्याचे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. यात काही महाविद्यालयीन युवतींचाही समावेश आहे. गावाहून आपल्या पालकांना महाविद्यालयात जात असल्याचे सांगून येथे येवून केवळ आपल्या मित्र मैत्रिणीसह दिवसभर बसून राहण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याकडे परिवहन विभागाच्यावतीने प्रारंभी लक्ष देण्यात आले; मात्र त्याचा या युवक युवतींवर काहीच परिणाम झाला नाही. सुटीचा दिवस असला तरी बसस्थानकावर या युवक युवतींची गर्दी राहत आहे. या स्कार्फच्या माध्यमातून बसस्थानकावरून छुपा वेश्याव्यवसायही चालत असल्याचा संशय पोलिसांना आला. अशात काही दिवसांपूर्वी या स्थानकावरून देवळी येथील काही तरुणींना पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. यामुळे आता पोलिसांनी या प्रकारावर आळा घालण्याकरिता स्कार्फ बांधून बसणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे पोस्टर्स लावले आहे. यामुळे या प्रकारावर आळा बसेल असा पोलिसांचा समज आहे.(प्रतिनिधी)
बसस्थानकावर स्कार्फधारींचे बस्तान
By admin | Updated: September 1, 2014 00:07 IST