खुबगाव : पाणी टंचाईमुळे परिसरातील ग्रामस्थांना पाण्याकरिता पायपीट करावी लागते. ही समस्या भविष्यात उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. पाण्याच्या समस्येसोबत जनावरांच्या वैरणाचा प्रश्नही अधिक गंभीर होऊ लागल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना या भयावह स्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे. याकरिता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या भागात सिंचन व्यवस्था नाही. शिवाय पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने परिसरातील गावांना याचा फटका सहन करावा लागतो. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही सुटू शकली नाही. भुजल पातळी चांगली असतानाही शासकीय यंत्रणेने या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने या भागात एकही प्रकल्प उभारल्या गेला नाही. त्यामुळे आज ही परिस्थती निर्माण झाली आहे. यावर तातडीची उपाययोजना करण्याची मागणी प्रलंबित आहे. प्रत्येक वर्षी थातूर-मातूर योजना राबविली जाते. यावर लाखो रुपये खर्च केले जाते. मात्र त्याचे फलित होत नाही. योजनेवर आजवर झालेला खर्च लक्षात पाहता या निधीतून कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना अंमलात येवू शकली असती. परंतु याकडे कुणी गांभिर्याने लक्ष दिले नाही. यामुळे आजही नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागते. या भागात पाण्याची मुबलकता आहे. पण पाणी नागरिकांपर्यंत पोहचविण्याची यंत्रणा नाही. दिवसेंदिवस ग्रामीण भागाची स्थिती दयनीय होत असून कमी अधिक पावसामुळे पिके, चारा यावर दुष्परिणाम झाला. शेतकरी, शेतमजूर कर्जबाजारी होऊन आर्थिक स्थिती ढासळली आहे. यामुळे कवडीमोल दराने जनावरे विक्री काढावी लागते. निसर्गही हुलकावनी देत असल्याने शेतकरी हतबल झाला. जनावरांकरिता चारा व पाणी नाही. शेतकर्यांना जनावरे कशी पाळायची असा प्रश्न आहे. जनावरांशिवाय शेतीची मशागत शक्य नाही. दुध व्यवसायावर उदरनिर्वाह करणार्यांना प्रश्न पडला आहे. या समस्या लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
ग्रामीण भागात पाण्यासह वैरणाचाही प्रश्न गंभीर
By admin | Updated: May 15, 2014 23:51 IST